IPL 2026 – गुजरातने घेतला राजस्थानचा बदला! विजयासह टायटन्स दुसऱ्या स्थानावर, शुभमनची तुफानी खेळी, रशिदचे 4 बळी
गुजरात टायटन्सने पुरेपूर बदला घेत राजस्थान रॉयल्सला धूळ चारली आणि आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या गुणतक्त्यामध्ये दुसरे स्थान पटकावले. शुभमन गिलच्या धडाकेबाज फटकेबाजीच्या जोरावर गुजरातने २२९ धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या संघाला १५२ धावा करता आल्या आणि गुजरातने ७७ धावांनी हा सामना सहजपणे जिंकला. रशिद खानने चार विकेट्स मिळवत राजस्थानला हतबल केले आणि गुजरातने दमदार विजयासह १४ गुण पूर्ण केले.
गुजरातने नाणेफेक जिंकल्यानंतर शुभमन आणि साई सुदर्शनने चौथ्याच षटकात संघाचे अर्धशतक पूर्ण केले. पॉवर प्लेनंतर साई मोठा फटका मारताना बाद झाला. त्याने ६ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५४ धावा केल्या. गुजरातला ११८ धावांची चांगलीच सलामी मिळाली. साई बाद झाला तरी गिल दमदार फटकेबाजी करत होता; पण मोठा फटका मारताना तो बाद झाला. गिलने ४४ चेंडूंत ९ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ८४ धावा केल्या.
राजस्थानचा संघ २३० धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरला. राजस्थानला वैभव सूर्यवंशीने तुफानी सुरुवात करून दिली होती; पण मोहम्मद सिराजच्या बाऊन्सवर मारलेला वैभवचा फटका हुकला आणि तो बाद झाला. वैभवने यावेळी फक्त १६ चेंडूंत ३ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ३५ धावा केल्या. कर्णधार बनलेल्या यशस्वी जयस्वालला फक्त तीनच धावा करता आल्या. वैभव बाद झाला आणि त्यानंतर राजस्थानच्या फलंदाजांनी आपल्या विकेट्स आंदण दिल्यामुळे त्यांची ५ बाद ९१ अशी अवस्था झाली होती. त्याचवेळी राजस्थानचा पराभव हा निश्चित झाला होता. रशिदने जडेजासह अन्य तीन फलंदाजांना बाद केले.
Comments are closed.