GT vs RR: गुजरात टायटन्सच्या दमदार विजयानंतर गुणतालिकेत उलथापालथ, प्लेऑफची चुरस आणखी वाढली!
शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने आयपीएल 2026 च्या 52व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला 77 धावांनी धूळ चारत गुणतालिकेत मोठा उलटफेर घडवून आणला आहे. गुजरातच्या संघाने या विजयासह थेट पाचव्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. राजस्थान रॉयल्सला या पराभवाचा मोठा फटका बसला असून पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघही प्रत्येकी एका स्थानाने खाली घसरले आहेत. आता गुणतालिकेतील अव्वल दोन स्थानांवर सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स हे संघ आहेत. दोन्ही संघांचे 14-14 गुण असले तरी सरस नेट रनरेटमुळे हैदराबाद अव्वल स्थानी आहे, तर गुजरात दुसऱ्या स्थानावर आहे.
RR vs GT सामन्यापूर्वी राजस्थान रॉयल्स चौथ्या स्थानावर तर पंजाब किंग्स पाचव्या स्थानावर होती. गुजरातने या मोठ्या विजयासह गुणतालिकेत मोठी झेप घेत थेट टॉप-2 मध्ये प्रवेश केला आहे. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सचा संघ आता टॉप-4 मधून बाहेर पडला आहे.
राजस्थान रॉयल्सचा गेल्या सात सामन्यांतील हा पाचवा पराभव ठरला, तर गुजरातने सलग चौथा विजय मिळवला आहे. सलग विजयाची लय गमावलेल्या पंजाब किंग्स आणि आरसीबीला गुजरातच्या विजयाचा फटका बसला आहे.
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, कर्णधार शुबमन गिलच्या 84 धावांच्या विस्फोटक खेळी आणि साई सुदर्शनच्या शानदार अर्धशतकानंतर राशिद खानच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सवर 77 धावांनी मोठा विजय मिळवला. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गडी गमावत 229 धावांचा हंगामातील सर्वोच्च स्कोर उभारला.
230 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानचा डाव 16.3 षटकांत 152 धावांवर आटोपला. गुजरातकडून राशिद खानने 33 धावांत 4 बळी घेतले. त्याला जेसन होल्डरने 12 धावांत 3 बळी घेत उत्तम साथ दिली. कगिसो रबाडाने 2 गडी बाद केले. मोहम्मद सिराजने भरपूर धावा दिल्या, मात्र त्याने वैभव सूर्यवंशीचा महत्त्वाचा बळी घेतला.
राजस्थानकडून रवींद्र जडेजाने 25 चेंडूत 38 धावा केल्या. वैभव सूर्यवंशीने 16 चेंडूत 36 धावांची तडाखेबंद खेळी केली, तर ध्रुव जुरेलने 10 चेंडूत 24 धावांचे योगदान दिले.
Comments are closed.