ऑनलाइन जगात बालपण असुरक्षित आहे
एनसीआरबीची धडकी भरवणारी आकडेवारी : मुलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये 46 टक्क्यांची वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या (एनसीआरबी) आकडेवारीनुसार 2024 मध्ये भारतात मुलांच्या विरोधात झालेल्या प्रत्येक 10 पैकी जवळपास 9 सायबर गुन्ह्यांमध्ये मुलांशी निगडित अश्लील सामग्री पाठविण्याचा गुन्हा सामील होता. देशभरात एकूण गुन्ह्यांमध्ये घट होऊनही मुलांच्या विरोधातील गुन्हे वाढत असल्याचे एनसीआरबीच्या नव्या आकडेवारीतून कळते. सायबर स्पेसमध्ये गुन्हेगारांकडून मुलांना, खासकरून किशोरवयीनांना लक्ष्य करण्यात येत आहे.
एनसीआरबीकडून जारी आकडेवारीनुसार 2024 मध्ये पूर्ण भारतात मुलांच्या विरोधात घडलेल्या गुन्ह्यांची एकूण 1,87,702 प्रकरण नोंद झाली होती, हे प्रमाण 2023 च्या 1,77,335 प्रकरणांच्या तुलनेत 5.8 टक्क्यांनी अधिक होते. याउलट मागील 4 वर्षांमध्ये भारतात एकूण गुन्ह्यांमध्ये जवळपास 10.8 टक्क्यांची घट झाली आहे. 2020 मधील 66.01 लाख प्रकरणांवरून घटत हे प्रमाण 2024 मध्ये 58.86 लाख प्रकरणांवर आले आहे.
आकडेवारी काय सांगते?
याचदरम्यान मुलांच्या विरोधात 2020 साली 1,28,531 गुन्हे घडले होते, हे प्रमाण 2024 मध्ये वाढून 1,87,702 वर पोहोचले. ही वाढ 46 टक्क्यांपेक्षा अधिक असून ही स्थिती चिंताजनक आहे. ‘चाइल्ड राइट्स अँड यू’ (क्राय) संस्थेकडून एनसीआरबीच्या आकडेवारीतून विश्लेषण करण्यात आले आहे. यानुसार 2024 मध्ये मुलांच्या विरोधातील सायबर गुन्ह्यांसंबंधी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गत 1,238 प्रकरणे नेंद झाली, हे प्रमाण मुलांच्या विरोधातील सर्व गुन्ह्यांच्या जवळपास 0.7 टक्के आहे.
छत्तीसगडमध्ये सर्वाधिक गुन्हे
1,099 प्रकरणांमध्ये मुलांचे अश्लील पद्धतीने चित्रण करणारी सामग्री प्रकाशित किंवा प्रसारित करण्यात आली होती. तर उर्वरित सर्व श्रेणींमधील एकूण प्रकरणे केवळ 139 होती. क्रायच्या राज्यनिहाय एनसीआरबीच्या डाटाच्या विश्लेषणानुसार छत्तीसगडमध्ये मुलांच्या विरोधात सर्वाधिक 268 सायबर गुन्हे घडल्याची नोंद करण्यात आली आहे.
दिल्लीतील सायबर गुन्हे
राजस्थान (174), दिल्ली (151), उत्तर प्रदेश (137) आणि केरळम (92) चे छत्तीसगडनंतर स्थान राहिले. या 5 राज्यांमध्ये देशात नोंद एकूण अशा सर्व प्रकरणांचा 66.4 टक्के हिस्सा होता. एनसीआरबीकडून जाहीर सायबर गुन्ह्यांची आकडेवारी ही ऑनलाईन स्पेसमध्ये मुलांची सुरक्षा एक राष्ट्रीय प्राथमिकता का असावी हे अधोरेखित करत असल्याचे क्रायचे कार्यक्रम संचालक सोहा मोइत्रा यांनी सांगितले आहे.
Comments are closed.