विश्वचषक तिरंदाजी स्पर्धा – साहिल जाधवचा कांस्यपदकावर निशाणा! मार्टिनला हरवून हिंदुस्थानला मिळवून दिले एकमेव पदक
मराठमोळ्या साहिल जाधवने विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेतील दुसऱ्या टप्यात कांस्यपदकावर निशाणा साधत कारकिर्दीतील पहिले पदक जिंकले. पुरुषांच्या वैयक्तिक कंपाउंड प्रकारातील कांस्यपदकाच्या लढतीत त्याने डेन्मार्कच्या मार्टिन डॅम्सबोचा १४७-१४४ असा पराभव करीत हिंदुस्थानला एकमेव पदक जिंकून दिले.
महाराष्ट्राच्या २५ वर्षीय साहिल जाधवने संपूर्ण सामन्यात संयमित आणि अचूक खेळाचे प्रदर्शन केले. पहिल्या एंडनंतर तो २९-३० असा पिछाडीवर होता. मात्र, त्यानंतर त्याने सातत्यपूर्ण पुनरागमन करत विजय निश्चित केला. साहिलचा उपांत्यपूर्व फेरीपर्यंतचा प्रवासही तितकाच थरारक ठरला. त्याने २०२१चा जगज्जेता असलेल्या ऑस्ट्रियाच्या निको वियनरला शूट-ऑफमध्ये पराभूत केले. निर्धारित फेरीनंतर दोघेही १४७ गुणांवर बरोबरीत होते. मात्र, उपांत्य लढतीत विद्यमान जग्जेत्या निकोलस गिरार्ड याच्याकडून साहिलला १४५-१४७ असा निसटता पराभव पत्करावा लागला आणि त्याचे अंतिम फेरीतील स्थान हुकले.
कंपाउंडमध्ये यंदा निराशा!
दरम्यान, हिंदुस्थानची कंपाउंड प्रकारातील एकूण मोहीम अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरली नाही. गेल्या वर्षी शांघायमध्ये हिंदुस्थानी संघाने पाच पदके जिंकली होती. यंदा मात्र कुशल दलाल उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला, तर माजी विश्वविजेता ओजस देवताळे याचे आव्हान उप उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. महिलांच्या वैयक्तिक कंपाउंड प्रकारात गतविजेती मधुरा धामणगावकर हिला अमेरिकेच्या अॅलेक्सिस रुईझ हिच्याकडून १४८-१४४ असा पराभव स्वीकारावा लागला.
रिकर्व्हमध्ये सुवर्णपदकाची आशा
रिकर्व्ह प्रकारात हिंदुस्थानचे आव्हान अद्याप कायम आहे. सिमरनजीत कौर हिने महिला वैयक्तिक रिकर्व्ह प्रकाराच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. शिवाय हिंदुस्थानी महिला रिकर्व्ह संघदेखील रविवारी (दि. ९) सुवर्णपदकासाठी चीनविरुद्ध भिडणार आहे.
Comments are closed.