धोनीचे राज्य संपणार! विराट-रोहितला आज 'थाला'च्या वर्चस्वाला पूर्णविराम देत इतिहास रचण्याची…
आयपीएल २०२६ मध्ये आज (१० मे) दोन सामने खेळले जाणार आहेत. यामधील संध्याकाळी खेळल्या जाणाऱ्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स भिडणार आहेत. लीगच्या १९ व्या हंगामातील हा ५४ वा सामना शहीद वीर नारायण सिंह स्टेडियम रायपूरमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना एमएस धोनीच्या खास विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे.
रोहित आणि विराट दोघांनी हा सामना खेळला तर ते या लीगमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याच्या धोनीच्या विक्रमाची बरोबरी करतील. धोनी पहिल्या हंगामापासून म्हणजे २००८ पासून या लीगमध्ये खेळत असून त्याने आतापर्यंत २७८ सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने चेन्नई सुपर किंग्ज आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्सचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामध्ये त्याने एकूण ५४३९ धावा केल्या असून २०२६ च्या हंगामात मात्र एकही सामना खेळलेला नाही.
धोनी पोटरीच्या दुखापतीमुळे त्रस्त असून त्याने आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही. आज (१० मे) चेन्नईचा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध असून तो त्या सामन्यात खेळणार की नाही याबाबतही शंका आहे. जर तो पुढील एकही सामना खेळला नाही तर आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित आणि विराट त्याच्यापुढे जातील. सध्या दोघेही २७७ सामन्यांसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी आहेत.
अशाप्रकारे आज किंग आणि हिटमॅनला थालाच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे. तसेच पुढील सामन्यांमध्ये दोघेही धोनीला मागे टाकू शकतात.
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळलेले खेळाडू-
२७८ – एमएस धोनी
277 – विराट कोहली
२७७ – रोहित शर्मा
२६४ – रवींद्र जडेजा
२५७ – दिनेश कार्तिक
विराट आणि रोहितची आतापर्यंतची कामगिरी पाहिली तर दोघांनी अनेक उल्लेखनीय खेळी करत संघाच्या विजयात महत्वाची भुमिका पार पाडली आहे. दोघेही २००८ पासून आयपीएलमध्ये खेळत आहेत.
विराट आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने २७७ सामन्यांच्या २६९ डावांमध्ये ९०४० धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ६६ अर्धशतके आणि ८ शतके केली आहेत. रोहितने २७७ सामन्यांच्या २७२ डावांमध्ये ७२६७ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ४९ अर्धशतके आणि २ शतके केली आहेत. तो या स्पर्धेच्या सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू-
विराट कोहली – ९०४०
रोहित शर्मा – ७२६७
शिखर धवन – ६७६९
डेव्हिड वॉर्नर – ६५६५
केएल राहुल – ५६९०
Comments are closed.