गेल्या ३ वर्षांत एअर इंडियाकडून १,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले, काय आहे कारण?

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

एअर इंडियाने गेल्या तीन वर्षांत नैतिकतेचे उल्लंघन केल्याप्रकरणी १,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या सवलतीच्या प्रवास सुविधेचा (ELT) गैरवापर करणाऱ्यांचाही समावेश आहे, अशी माहिती विमान कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कॅम्पबेल विल्सन यांनी दिली. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

विल्सन यांनी सांगितले की, नियमांचे पालन न केल्यामुळे दरवर्षी शेकडो कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाते. विमान कंपनी सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असून खर्च कपातीचे उपाय राबवत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या एका बैठकीत विल्सन यांनी ही माहिती दिली.

कारवाईची प्रमुख कारणे

टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियामध्ये सध्या सुमारे २४,००० कर्मचारी कार्यरत आहेत. ज्या कारणांसाठी कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली, त्यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे:

  • विमानातील वस्तूंची तस्करी करणे.
  • अतिरिक्त सामानासाठी शुल्क न आकारता परवानगी देणे.
  • कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या सवलतीच्या प्रवास सुविधेचा गैरवापर करणे.

मार्च महिन्यात समोर आलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाने सवलतीच्या प्रवास धोरणात मोठ्या प्रमाणावर तफावत आढळल्यानंतर ४,००० हून अधिक कर्मचाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईसह सुधारणात्मक पावले उचलली आहेत.

एअर इंडियाने सध्या कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ रोखली असून, अनावश्यक खर्च टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. विल्सन यांनी कर्मचाऱ्यांना सावध केले की, जर मध्यपूर्वेतील परिस्थिती सुधारली नाही, तर आगामी वर्ष अत्यंत कठीण असणार आहे.

Comments are closed.