IPL च्या पॉइंट्स टेबलमध्ये ट्विस्टवर ट्विस्ट; एका दिवसात 2 संघ OUT! RCB नंबर-1, पंजाब चौथ्या स्

RCB वि MI नंतर आयपीएल 2026 गुण सारणी : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कर्णधार रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सवर 2 विकेट्सने थरारक विजय मिळवला. या विजयानंतर आरसीबीने आयपीएल 2026 गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. संघाच्या खात्यात आता 14 गुण झाले असून सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्याइतकेच गुण असले तरी नेट रनरेटमुळे आरसीबी पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. या विजयासह बंगळुरूने प्लेऑफकडे आणखी एक भक्कम पाऊल टाकले आहे. आरसीबीच्या या विजयामुळे दोन संघ अधिकृतपणे आयपीएल 2026 प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. त्यामध्ये पाच वेळा विजेतेपद पटकावणारी मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांचा समावेश आहे.

MI आणि LSG बाहेर

मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांच्या 11 सामन्यांत प्रत्येकी फक्त 6 गुण आहेत. उर्वरित तीनही सामने जिंकले तरी त्यांचे गुण 12 पर्यंतच पोहोचू शकतात. दुसरीकडे गुणतालिकेतील टॉप-4 संघांकडे आधीच 13 किंवा त्याहून अधिक गुण आहेत. आरसीबी, एसआरएच आणि जीटी यांच्या खात्यात 14-14 गुण आहेत, तर पंजाब किंग्स 13 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे मुंबई आणि लखनऊला 12 गुणांपर्यंत पोहोचूनही प्लेऑफचे तिकीट मिळू शकणार नाही.

आरसीबीचा दमदार कमबॅक

सलग दोन सामने गमावल्यानंतर आरसीबी या सामन्यात उतरली होती. रायपूरमध्ये सामना सुरू असताना एका टप्प्यावर बंगळुरूचा पराभव निश्चित वाटत होता. मात्र अखेरच्या क्षणी सामन्याने नाट्यमय वळण घेतले आणि आरसीबीने बाजी मारली. आरसीबीच्या खात्यात आता 11 सामन्यांनंतर 14 गुण झाले आहेत. प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी त्यांना उर्वरित तीन सामन्यांपैकी किमान एक विजय आवश्यक आहे. मात्र संघाची नजर केवळ पात्रतेवर नाही, तर टॉप-2 मध्ये स्थान मिळवण्यावरही आहे.

गुणतालिकेतील टॉप-4 संघ

सध्या आरसीबीसोबत सनरायझर्स हैदराबाद, गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स हे चार संघ अव्वल चारमध्ये आहेत. आरसीबी, एसआरएच आणि जीटी यांच्या खात्यात 14-14 गुण आहेत, तर पंजाब 13 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे प्लेऑफसाठीचे इतर प्रमुख दावेदार मानले जात आहेत. दोन्ही संघांच्या खात्यात 12-12 गुण आहेत. तसेच कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघही अद्याप स्पर्धेत टिकून आहेत.

राजस्थान रॉयल्सने सलग दोन सामने गमावल्याने त्यांची लय ढासळली आहे. दुसरीकडे चेन्नई आणि कोलकाता यांनी पुन्हा दमदार खेळ दाखवण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः सीएसकेने पुनरागमनाची चिन्हे दाखवली असून ते टॉप-4 संघांना कडवी टक्कर देऊ शकतात. चेन्नईच्या खात्यात 11 सामन्यांनंतर 12 गुण आहेत आणि उर्वरित तीन सामने जिंकले तर ते थेट 18 गुणांपर्यंत पोहोचू शकतात.

हे ही वाचा –

RCB vs MI Rajat Patidar : शेवटच्या चेंडूवर RCB जिंकली… तरीही पाटीदार भडकला! म्हणाला, आम्ही हा सामना जिंकण्याच्या लायकीचे नव्हतो, पण…

आणखी वाचा

Comments are closed.