आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्समध्ये 900 हून अधिक अंकांनी घसरण, निफ्टीत

आज शेअर बाजार: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळत असून घसरणीचा हा वेग वेळोवेळी वाढत आहे. सध्या सेन्सेक्समध्ये 900 हून अधिक अंकांची घसरण झाली असून तो 78,200 च्या पातळीखाली घसरला आहे. तर निफ्टी सुमारे 1.2 टक्के म्हणजेच 290 अंकांनी कोसळून 23,800 च्या आसपास व्यवहार करत आहे.

आठवड्याच्या पहिल्याच व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली. अमेरिका आणि इराण यांच्यात वाढत असलेला तणाव तसेच कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम बाजारावर दिसून आला. व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक कोसळले. बीएसईचा 30 शेअर्सचा संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स 690 अंकांच्या मोठ्या घसरणीसह 76,638 या पातळीवर उघडला. तर निफ्टी 206 अंकांनी घसरून 23,970 वर व्यवहार सुरू झाला. दरम्यान, भारतीय रुपयानेही आजपर्यंतची सर्वात नीचांकी पातळी गाठली असून डॉलरच्या तुलनेत रुपया 95.62 वर पोहोचला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share Market: बाजार कोसळण्याची प्रमुख कारणे

1. कच्च्या तेलाचा भडका: ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत 104 डॉलर प्रति बॅरलच्या पार गेली आहे. भारत हा कच्च्या तेलाचा मोठा आयातदार असल्याने वाढत्या किमतींचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि कंपन्यांच्या नफ्यावर होत आहे.

2. होर्मुझची नाकेबंदी आणि पुरवठा साखळी: इराण आणि अमेरिका यांच्यातील वादामुळे ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’मध्ये पुरवठा साखळी ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे जागतिक स्तरावर वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

3. परदेशी गुंतवणूकदारांची माघार: जागतिक तणाव पाहता परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून पैसा काढून तो डॉलर किंवा सोन्यासारख्या सुरक्षित पर्यायांमध्ये गुंतवण्यास सुरुवात केली आहे.

Share Market: जागतिक बाजारातील कल

आशियाई बाजारात संमिश्र कल पाहायला मिळाला. जपानचा निक्केई आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी वधारले असताना, ऑस्ट्रेलियाचा बाजार मात्र घसरणीसह व्यवहार करत होता. तिकडे अमेरिकन स्टॉक फ्युचर्समध्येही घसरण दिसून आली, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Crude Oil: कच्च्या तेलात मोठी वाढ

WTI क्रूड 3.67 टक्क्यांनी वाढून 99.04 डॉलरवर पोहोचले आहे, तर ब्रेंट क्रूड 3.44 टक्क्यांनी वधारून 104.81 डॉलरवर पोहोचले आहे. कच्च्या तेलातील ही वाढ भारतीय तेल शुद्धीकरण आणि पेंट कंपन्यांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.

आणखी वाचा

Gold Silver Price: अमेरिका इराण युद्धाचा सोने-चांदी दरावर परिणाम; सोने तब्बल 30 ते 40 हजारांनी स्वस्त, चांदीचे भावही कोसळले

आणखी वाचा

Comments are closed.