इराणने अमेरिकेचा 14 कलमी प्रस्ताव नाकारला; होर्मुझबाबत ठेवली महत्त्वाची अट

अमेरिका, इस्रायल-इराणमध्ये सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेने इराणला १४-कलमी प्रस्ताव पाठवला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून ते परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांच्यापर्यंत सर्वजण इराणच्या प्रतिसादाची प्रतीक्षा करत होते. इराणने आता अमेरिकेला आपला प्रतिसाद पाठवला आहे. पाकिस्तानमार्फत पाठवलेल्या या प्रतिसादात इराणने ट्रम्प यांचा शांतता प्रस्ताव फेटाळला आहे. तसेच होर्मुझबाबत महत्त्वाची अट ठेवली आहे.

इराणने ट्रम्प यांचा शांतता प्रस्ताव फेटाळला असून अमेरिकेने होर्मुझवरील इराणचे सार्वभौमत्व स्वीकारावे असे म्हटले. इराणने स्पष्ट केले आहे की, येथे कोणीही ट्रम्प यांना खूश करण्यासाठी प्रस्ताव तयार करत नाही. आम्ही आमचे अधिकार आणिसार्वभौमत्वाशी तडजोड करणार नाही. त्यामुळे आमच्या प्रतिसादाने ट्रम्प नाराज असतील, तरीही हरकत नाही.

इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, युद्धामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याची मागणी इराणकडून करण्यात आली आहे. इराणने अमेरिकेकडे होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील आपले सार्वभौमत्व मान्य करण्याची मागणीही केली आहे. इराणची वृत्तसंस्था, तस्नीमने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, जर ट्रम्प या प्रतिसादाने समाधानी नसतील, तरीही हरकत नाही. इराणमध्ये कोणीही ट्रम्प यांना खूश करण्यासाठी योजना आखत नाही.

तस्नीमने दिलेल्या माहितीनुसार सूत्रांचे म्हणणे आहे की वाटाघाटी करणाऱ्या पथकाने इराणच्या हक्कांचा आदर करणाऱ्या योजना तयार केल्या पाहिजेत. इराणच्या प्रतिसादात इराणच्या तेल विक्रीवरील अमेरिकेचे निर्बंध उठवण्याचीही मागणी करण्यात आली आहे. तस्नीमच्या मते, इराणने युद्ध त्वरित आणि सर्व आघाड्यांवर संपवण्याच्या गरजेवर जोर दिला आहे.

इराणने पुन्हा हल्ला होणार नाही याची हमी देखील मागितली आहे. इराणने असेही म्हटले आहे की प्राथमिक करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर इराणची नौदल नाकेबंदी उठवली पाहिजे. पाकिस्तानने अमेरिकेच्या शांतता प्रस्तावाला इराणचे प्रत्युत्तर मिळाल्याची पुष्टी केली आहे.

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी आधीच संकेत दिले होते की, ते अमेरिकेच्या अटी स्वीकारणार नाहीत. आम्ही शत्रूपुढे कधीही झुकणार नाही. जर संवाद किंवा वाटाघाटींचा मुद्दा उपस्थित झाला, तर त्याचा अर्थ शरणागती किंवा माघार असा होत नाही. इराणच्या हक्कांचे रक्षण करणे आणि पूर्ण ताकदीने त्यांचे संरक्षण करणे हे आमचे ध्येय आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

Comments are closed.