मुलीचं पळून जाऊन लग्न, भोंदूबाबानं स्टॅम्पवर लिहून दिलं, बापाकडून 1 लाख घेतले; भंडाऱ्यात खळबळजन
भंडारा : राज्यात अशोक खरातनंतर अनेक भोंदूबाबाचे कारनामे,लुट यांची प्रकरणे समोर आली. आता भंडाऱ्यातून (Bhandara Crime News) देखून एका भोंदूबाबाचा कारनामा समोर आला आहे. प्रेमविवाहासाठी घरातून पळून गेलेल्या मुलीला परत आणण्यासाठी या भोंदूबाबाने त्या मुलीच्या वडिलांकडून तब्बल १ लाख रुपये लुटल्याची (Bhandara Crime News) माहिती समोर आली आहे. इतकंच नाही तर १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मुलगी परत आणण्याची लेखी हमी दिली होती.(Bhandara Crime News)
Bhandara Crime News: भोंदू बाबानं चक्क १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून हमी दिली…
प्रेमविवाह करून पळून गेलेली मुलगी परत आणून देतो, असं आमिष दाखवून एका भोंदू बाबानं एका पित्याची १ लाख ८ हजार रूपयांनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील अड्याळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे, या भोंदू बाबानं चक्क १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मुलगी परत आणण्याची लेखी हमी दिली होती. करणी-बाधेच्या नावाखाली सामान्यांना लुटणाऱ्या भोंदूगिरीचा आणखी एक प्रकार भंडाऱ्यात उघडकीस आला आहे. अड्याळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळगाव निपाणी येथील हेमदास बावणे या स्वयंघोषित बाबानं एका हतबल पित्याला लुटलं आहे.(Bhandara Crime News)
Bhandara Crime News: मुलीवर करणी आणि भानामती झाल्याची भीती घातली…
भंडारा तालुक्यातील बोरगाव येथील शिवशंकर डोरले यांची मुलगी शेजारच्या तरुणासोबत पळून गेली होती. मुलगी परत मिळावी या विवंचनेत असताना, त्यांची भेट हेमदास बावणे याच्याशी झाली. मुलीवर करणी आणि भानामती झाली आहे, ती उतरवण्यासाठी पूजा करावी लागेल, असा दावा या भोंदू बाबानं केला. सुरुवातीला पूजा करण्याच्या नावाखाली बाबानं ८ हजार रुपये उकळले. पूजा करूनही मुलगी परतली नाही, तेव्हा बाबानं भीती घातली की, मुलीच्या जीवाला धोका आहे.
Bhandara Crime News: ‘मुलगी परत येईल, अन्यथा पैसे परत करू’
विश्वास संपादन करण्यासाठी बाबानं चक्क १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं की, ‘मुलगी परत येईल, अन्यथा पैसे परत करू’. या आमिषाला बळी पडून वडिलांनी आणखी १ लाख रुपये बाबाला दिले. मुलगी परत नं आल्यानं आपली फसवणूक झाल्याचं डोरले यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी थेट अड्याळ पोलीस ठाणे गाठलं. पोलिसांनी या भोंदू बाबावर ‘जादूटोणा विरोधी कायद्या’ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या अशा भोंदू बाबांपासून सावध राहण्याची गरज पुन्हा एकदा या घटनेनं अधोरेखित केली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत की या बाबानं आणखी किती जणांना अशा प्रकारे गंडा घातला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.