शेअर बाजाराच्या बातम्या – शेअर बाजारात मोठी घसरण; गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी बुडाले
आठवड्याचा पहिला दिवस शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी वाईट ठरला. बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीने झाली आणि शेवटपर्यंत घसरण कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १,३१२ अंकांच्या घसरणीसह बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ३६० अंकांच्या घसरणीसह बंद झाला. शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. या घसरणीमुळे एकूण 6 लाख कोटींचे नुकसान झाले आहे.
आजच्या या घसरणीचा सर्वाधिक फटका टायटन, सेन्को गोल्ड आणि कल्याण ज्वेलर्स यांना बसला. तसेच ज्वेलरी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. बाजारातील ही उलथापालथ देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा अनेक घटकांमुळे झाली. सोमवारी दिवसभर शेअर बाजारात घसरण सुरू होती. बीएसई लार्ज-कॅप आणि स्मॉल-कॅप बाजारातील शेअर्समध्ये घसरण झाली. बीएसई सेन्सेक्स १,३०० हून अधिक अंकांनी घसरून बंद झाला.
सेन्सेक्स आणि निफ्टी शेवटपर्यंत घसरत राहिले. बीएसई सेन्सेक्स सोमवारी त्याच्या आदल्या दिवसाच्या ७७,३२८ च्या बंद भावाच्या तुलनेत ७६,६३८ वर उघडला आणि व्यवहारादरम्यान तो ७५,९५७ पर्यंत घसरला. तथापि, या मोठ्या घसरणीतून निर्देशांक किंचित सावरला आणि ७६,०१५ वर बंद झाला. त्यात १३१२.९१ अंकांची म्हणजेच १.७० टक्क्यांची घसरण झाली.
निफ्टी त्याच्या मागील बंद भावापेक्षा २४,१७६ वरून घसरून २३,९७० वर उघडला आणि सेन्सेक्सच्या बरोबरीने दिवसभर घसरत राहिला. व्यवहारादरम्यान, हा निर्देशांक २३,७९९ पर्यंत घसरला, पण अखेरीस तो ३६० अंकांनी म्हणजेच १.४९ टक्क्यांनी घसरून २३,८१५.८५ वर बंद झाला.
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठे नुकसान झाले आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल गेल्या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी ४७३ लाख कोटी रुपये नोंदवले गेले होते. सोमवारच्या घसरणीनंतर ते ४६७ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे. परिणामी, गुंतवणूकदारांना ६ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
अमेरिका-इराण शांतता चर्चेचा प्रस्ताव पुन्हा एकदा करारापर्यंत पोहोचण्यात आलेले अपयश याचा बाजारावर नकारातमक परिणाम झाला. अमेरिका-इराण शांतता चर्चेचा प्रस्ताव पुन्हा एकदा अयशस्वी झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत अचानक वाढ झाली. जागतिक स्तरावर, ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती ४.५० टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल जवळपास १०६ डॉलरवर पोहोचल्या आणि महागाईच्या वाढत्या धोक्यामुळे शेअर बाजारावर दबाव वाढला.
बाजारातील घसरणीचे आणखी एक कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखाती युद्धाच्या तणावामुळे सोने, पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्याचे केलेले आवाहन. त्यांनी आखाती युद्धाचा हिंदुस्थानवर होणाऱ्या गंभीर परिणामाचा उल्लेख करत, आपण कोणत्याही परिस्थितीत परकीय चलन वाचवले पाहिजे असे म्हटले.
जागतिक बाजारपेठेनेही बाजारातील भावनांवर परिणाम करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे आशियाई शेअर बाजारांमध्ये घसरण झाली आणि सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टीदेखील ३०० अंकांनी घसरला, ज्यामुळे भारतीय शेअर बाजारासाठी नकारात्मक संकेत मिळाले.
भारतीय चलन रुपयानेही भारतीय शेअर बाजारावर दबाव टाकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात तो आणखी ४० पैशांनी घसरला. या चलन घसरणीचा शेअर बाजारावर थेट परिणाम झाला. शेअर बाजारासाठी भीतीचा निर्देशांक मानल्या जाणाऱ्या इंडिया व्हीआयएक्समध्ये (VIX) पुन्हा एकदा मोठी वाढ दिसून आली आहे. तो सुमारे १२ टक्क्यांनी वाढून १८ चा टप्पा ओलांडून गेला आहे. या सर्व घडामोडींमुळे बाजारात मोठी घसरण दिसून आली.
Comments are closed.