उरणकरांना पाण्याचे टेन्शन; ३० जूनपर्यंतच साठा, रानसई धरणाची पातळी खालावली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढू लागल्याने बाष्पीभवन झपाट्याने होत आहे. रानसई धरणाची पातळी खालावली असून ३० जूनपर्यंतचाच साठा शिल्लक आहे. त्यामुळे उरणकरांना पाण्याचे टेन्शन असून वेळेवर पाऊस आला नाही तर करायचे काय, अशी चिंता सतावत आहे. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवार व शुक्रवार असे आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात करण्यात आली आहे. धरणातील कमी पाणीसाठा तसेच वाढता उन्हाळा लक्षात घेता नागरिकांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार आहे.

उरण तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींमधील गावांना रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र फेब्रुवारी-मार्च महिन्यापासूनच तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईने ग्रासले आहे. करंजा गावातील नागरिकांना पाण्यासाठी १२ ते १५ दिवस प्रतीक्षा करावी लागते. सुमारे १७ हजार लोकसंख्या असलेल्या केगाव ग्रामपंचायतीतील गावांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

विहिरी, तलाव आणि बोअरवेल यांनीही तळ गाठल्याने गरजेइतक्या पाण्यासाठीही महिलांवर मिळेल तेथून पाणी आणावे लागत आहे. काही गावांमध्ये याआधी दोन तीन दिवसाआड मिळणारे पाणी आता ८-१० दिवसांनंतरही मिळेनासे झाले आहे. पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी टँकरने पुरवठा करण्याचा प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे पाठवला असल्याची माहिती तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली.

जलजीवन मिशनची कामे खोळंबली

यामुळे केगाव, चाणजे, पुनाडे येथील कामे खोळंबली आहेत. केगाव येथील कामांची बिले वेळेवर मिळत नसल्याने कंत्राटदार गायब झाले आहेत. एक लाख लिटर क्षमतेच्या ओव्हरहेड पाण्याच्या टाकीचे काम बंदच असल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती महेश म्हात्रे यांनी यांनी दिली

Comments are closed.