ग्रामपंचायत सदस्याच्या कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, घरावर पेट्रोल बॉम्बने हल्ला केला अन्.
भंडारा क्राईम न्यूज : भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील शहापूर (Shahapur) परिसरात पहाटेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी ग्रामपंचायत सदस्याच्या कुटुंबाला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. सुदैवाने कुटुंबातील सर्वांचे नशीब बलवत्तर ठरल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही, मात्र हल्ल्यात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
शहापूर ग्रामपंचायतीचे सदस्य सचिन गाडेकर (Sachin Gadekar) यांच्या घरावर अज्ञात इसमांनी पेट्रोल बॉम्ब हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास अचानकपणे गाडेकर यांच्या घराच्या आवारात पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला. या हल्ल्यामुळे घराच्या अंगणात उभ्या असलेल्या चार दुचाकी आणि घरासमोरील एक कारला भीषण आग लागली. काही मिनिटांतच ही सर्व वाहने पूर्णपणे जळून खाक झाली.
Bhandara Crime News: कुटुंबीयांनी समयसूचकता दाखवत केली आरडाओरड
आग लागल्याचे लक्षात येताच गाडेकर कुटुंबीयांनी समयसूचकता दाखवत आरडाओरड सुरू केली. आवाज ऐकून शेजारी धावून आले. नागरिक जमा होत असल्याचे लक्षात येताच हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, तोपर्यंत वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, ही घटना वैयक्तिक वादातून घडली की राजकीय कारणातून, याचा तपास सुरू आहे.
Bhandara Crime News: परिसरात भीतीचे वातावरण
घटनेची माहिती मिळताच जवाहरनगर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. ग्रामपंचायत सदस्याच्या घरावर थेट पेट्रोल बॉम्ब हल्ला झाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, या घटनेने भंडारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
https://www.youtube.com/watch?v=a5B0FhXuLoY
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.