वणीत मुंबई क्राईम ब्रांचचा छापा; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दोघे ताब्यात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मनी लॉन्ड्रिंग आणि संशयास्पद बँक व्यवहार प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचच्या पथकाने वणी शहरात धडक कारवाई करत नांदेपेरा येथील दोन तरुणांना ताब्यात घेतल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. कारवाईनंतर पोलीस पथक दोघांना मुंबईकडे घेऊन रवाना झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश गौहोकर व पवन चहानकर अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. यातील एक तरुण वणी शहरात वाहन वॉशिंग सेंटर चालवित असल्याची माहिती आहे. या दोघांच्या बँक खात्यांतून लाखो रुपयांचे संशयास्पद व बेनामी व्यवहार झाल्याचा संशय मुंबई क्राईम ब्रांचला आहे.

विशेष म्हणजे, या प्रकरणाचे धागेदोरे शहरात गाजलेल्या ‘एमडी ड्रग्स’ प्रकरणातील मुख्य संशयित ‘सोनू’ याच्याशी जुळत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ड्रग्स विक्रीतून आलेला पैसा या तरुणांच्या खात्यांमार्फत वळवण्यात आला का, याचा तपास आता सुरू करण्यात आला आहे.

रविवारी सकाळी मुंबई क्राईम ब्रांचचे पथक गुप्तपणे वणीत दाखल झाले. संशयितांच्या खात्यांमध्ये गेल्या काही दिवसांत मोठ्या रकमेची उलाढाल झाल्याचे तपासात समोर आले असून, त्या पैशांचे स्त्रोत अद्याप स्पष्ट झालेले नाहीत.

मनी लॉन्ड्रिंग आणि ड्रग्स नेटवर्क यांचा थेट संबंध असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे असं खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. ताब्यात घेतलेल्या दोघांची मुंबईत कसून चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Comments are closed.