सल्ले देण्यापेक्षा स्वतःपासून सुरुवात करा; नाना पटोलेंचे पंतप्रधानांना पत्र, शासकीय दौऱ्यांतील खर्चावर ओढले ताशेरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला बचतीचा आणि काटकसरीचा सल्ला दिला. त्यानंतर आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. “इंधन बचतीचा आणि काटकसरीचा संदेश प्रभावीपणे पोहोचवायचा असेल, तर त्याची सुरुवात सरकारने स्वतःपासून करावी,” अशा शब्दांत पटोले यांनी पंतप्रधानांना टोला लगावला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या अलीकडील भाषणात नागरिकांना परदेश दौरे टाळण्याचे, इंधनाचा वापर कमी करण्याचे आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाचा धागा पकडत नाना पटोले यांनी पंतप्रधानांच्या आगामी परदेश दौऱ्यांवर आणि देशांतर्गत दौऱ्यांतील शाही थाटावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

नाना पटोले यांनी पत्रात म्हटले आहे की, “कालच्या आपल्या (पंतप्रधान मोदी) भाषणामध्ये आपण देशातील नागरिकांना परदेश दौरे टाळण्याचे, इंधनाचा वापर कमी करण्याचे, मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करण्याचे तसेच अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन केले, देशहिताच्या दृष्टीने नागरिकांनी काटकसरीचा अवलंब करावा, हा संदेश निश्चितच महत्वाचा आहे. मात्र त्याचवेळी आपण स्वीडन, नॉर्वे, युएई आणि इटली या देशांच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे समजले. तसेच काल तेलंगणा, बेंगळुरू आणि जामनगर येथील आपल्या दौ-यांदरम्यान चार्टर विमानांचा वापर करण्यात आला. प्रत्येक विकाणी मोठ्या प्रमाणावर रेली आणि वाहनताफ्यांचे आयोजन करण्यात आले होते.”

पत्रात ते पुढे म्हणाले की, “जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत असल्याची बाब आपण अधोरेखित केली आहे. अशा परिस्थितीत इंधन बचतीचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचवायचा असेल, तर त्याची सुरुवात सरकारकडून होणे आवश्यक आहे. शासकीय दौऱ्याऱ्यांमध्ये शक्य तिथे काटकसर करणे, चार्टर विमानांचा वापर मर्यादित ठेवणे तसेच वाहनताफे कमी करणे, हा देखील इधन बचतीसाठी महत्वाचा संदेश ठरू शकतो.”

पटोले म्हणाले, “सामान्य नागरिकांवर काटकसरीचे आवाहन करताना लोकप्रतिनिधींनी आणि सत्ताधाऱ्यांनीही त्याच तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे, अशी जनतेची अपेक्षा आहे. त्यामुळे आपण स्वतःपासून आणि आपल्या पक्षापासून या उपक्रमाची सुरुवात करावी, ही विनंती.”

Comments are closed.