मुख्यमंत्री व्हायचं असेल तर सत्ता सोडावी लागेल, भाजपच्या विरोधात संघर्ष करावा लागेल: रोहित पवार

रोहित पवार: अजितदादांच्या बाबतीत जे घडले यानंतर सुनेत्रा काकींनी स्वतःची काळजी घ्यायला हवी होती. त्यांनी असे का केले हे मी सांगू शकत नसलो तरी प्रोटोकॉल विभागाने तरी याची खबरदारी घेणे गरजेचे होते अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या आजच्या प्रवासाबाबत वक्तव्य केले आहे. सुनेत्रा पवार यांच्या गाडीचे सारथ्य अनिकेत तटकरे यांनी केल्याबाबत प्रश्न विचारला असता रोहित पवारांनी अशा पद्धतीने काळजी व्यक्त केली. दादांच्या बाबतीत हे घडल्यानंतर काकींनी रिस्क घ्यायला नको होती असे रोहित पवार म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री व्हायचे असेल तर सत्ता आणि छान छोकी सोडावी लागेल, असा टोला रोहित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला लगावला.

अजितदादांच्या बाबतीत झेड सेक्युरिटी असताना देखील प्रोटोकॉल पाळला गेला नाही

अजितदादांच्या बाबतीत झेड सेक्युरिटी असताना देखील प्रोटोकॉल पाळला गेला नाही आणि संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला होता. आता सुनेत्रा काकींनी त्यांची काळजी स्वतः घेणे हे तितकेच महत्त्वाचे आहे असे सांगताना प्रोटोकॉल विभागाने देखील एकदा चूक झालेली संपूर्ण महाराष्ट्राला महागात पडली असताना आता तरी प्रोटोकॉल विभागाने सुरक्षेबाबत लक्ष देणे गरजेचे असल्याचा सल्लाही रोहित पवार यांनी दिला आहे.

भाजपच्या विरोधात संघर्ष केल्यास मुख्यमंत्री पद मिळू शकेल

अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकले नसले तरी सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील अशा पद्धतीची वक्तव्य सध्या अजित पवार गटाकडून येत असताना तो त्यांचा अंतर्गत विषय आहे असे रोहित पवार म्हणाले. पुढील मुख्यमंत्री व्हायचा असेल तर लोकात उतरुन भाजप विरोधात संघर्ष करावा लागेल. सध्या असलेली सत्ता आणि छान छोकी सोडावी लागेल असा टोलाही रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांना दिला. कारण पुढच्या वेळेला सत्ता आली तरी भाजपचाच मुख्यमंत्री होईल. मग मुख्यमंत्री तुम्हाला व्हायचं असेल तर जनतेत उतरुन भाजपच्या विरोधात संघर्ष केल्यास मुख्यमंत्री पद मिळू शकेल पण यासाठी आधी सत्ता सोडावी लागेल छान छोकी सोडावी लागेल असा टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला.

तुमच्या मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी करा, रोहित पवारांचा हल्लाबोल

दरम्यान, यावेळी रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली. सर्वसामान्य गोरगरिबांना तेल खाऊ नका पेट्रोल डिझेल वापरु नका हे सांगण्यापेक्षा तुमच्या मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी करा. तुमच्या कार्यक्रमात आकाशात उडवण्यात येणारे विमानाला पेट्रोल लागत नाही का? अशा शब्दात आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी थेट नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली. तुमच्यासोबत सत्तेत असणारा एक आमदार जातीवादी वक्तव्य करतो आणि नंतर मोटरसायकलची रॅली काढतो. त्याला पेट्रोल लागत नाही का?  असा सवाल करीत रोहित पवार यांनी टोलेबाजी केली. शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी माळशिरस तालुक्यातील निमगाव येथे आले असता शेतकरी मेळाव्यानंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना मोदी आणि फडणवीस सरकार वर टोलेबाजी केली.

आणखी वाचा

Comments are closed.