बिबट्याच्या दहशतीमुळे आदिवासींची उपासमार
बिबट्याच्या दहशतीमुळे शहापूर तालुक्यातील आदिवासींची उपासमार सुरू झाली आहे. जंगलात मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यास डोळखांब वनपरिक्षेत्र कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना अपयश आले आहे. त्यामुळे जंगलावर उदरनिर्वाह अवलंबून असलेल्या आदिवासींच्या अडचणी वाढल्या आहेत. करवंदे, आंबे, आवळा, जांभूळ तसेच इतर नैसर्गिक वनउत्पादने गोळा करण्यासाठी त्यांना जंगलात जाता येत नाही. त्यामुळे चटणी-भाकरीसाठी पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
डोळखांब विभागातील विविध गावांमध्ये नागरिकांना बिबट्याचे दररोज दर्शन होत आहे. वनविभागाने परिसरात कॅमेरे बसवले असून त्यामध्येही बिबट्याची हालचाल स्पष्ट दिसून येत आहे. तरीदेखील वनविभागाकडून प्रभावी व तातडीची कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बिबट्याच्या भीतीने जंगलात जाता येत नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. महिला, लहान मुले व शेतकरी यांच्यामध्ये सतत भीतीचे वातावरण आहे.
…तर मोर्चा काढणार
डोळखांब वनपरिक्षेत्रातील घाटारीलगत पाड्यात एका आठ वर्षीय बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या घटनेनंतरही बिबट्याने गावपाड्यात पशुपक्ष्यांवर हल्ले चढवले आहेत. मात्र त्यानंतरही या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला अपयश आले आहे. हा बिबट्या जर लवकर पकडला गेला नाही तर वनविभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा या भागातील ग्रामस्थांनी दिला आहे.
कायमस्वरूपी रेस्क्यू टीमची गरज
शहापूर तालुक्यात जंगलाचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे या विस्तीर्ण वनक्षेत्रामध्ये कायमस्वरूपी रेस्क्यू टीम असणे गरजेचे आहे. मात्र रेस्क्यू टीम तालुक्यासह ठाणे जिल्ह्यातदेखील नाही. त्यामुळे बिबट्याचे हल्ले झाल्यानंतर बोरीवली येथील रेस्क्यू टीमची प्रतीक्षा करावी लागते. शहापूर तालुक्यात वनपरिक्षेत्रात कायमस्वरूपी स्वतंत्र रेस्क्यू टीम स्थापन करण्यात यावी, या भागात मुक्त संचार करणाऱ्या संबंधित बिबट्याला तात्काळ पकडण्यासाठी विशेष पथक नेमण्यात यावे अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
Comments are closed.