दिव्यातील शिंदे गटाच्या नऊ नगरसेवकांना अपात्र करा; शिवसेना, मनसेची ठाणे कोर्टात याचिका
दिव्यातील शिंदे गटाच्या निवडून आलेल्या नऊ नगरसेवकांनी आपल्या शपथपत्रात मालमत्ता तसेच आर्थिक स्थितीची माहिती अपूर्ण दिली असून बेकायदा बांधकामांची व मालमत्तांची माहितीदेखील लपवली आहे, असा आरोप करणारी याचिका शिवसेना व मनसेच्या उमेदवारांनी ठाणे कोर्टात दाखल केली आहे. शिंदे गटाच्या निवडून आलेल्या या नगरसेवकांना अपात्र करा, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
ठाणे महापालिकेच्या झालेल्या निवडणुकीत दिवा विभागातून शिंदे गटाचे रमाकांत मदवी, शैलेश पाटील, आदेश भगत, दीपक जाधव, साक्षी मदवी, दर्शना म्हात्रे, अर्चना पाटील, दीपाली भगत आणि स्नेहा पाटील हे नऊ उमेदवार निवडून आले. मात्र त्यांनी आपल्या शपथपत्रामध्ये चुकीची माहिती दिली असल्याचा आरोप याचिकेत केला आहे.
शिंदे गटाच्या निवडून आलेल्या या नगरसेवकांना अपात्र करावे, अशी मागणी करणारी स्वतंत्र याचिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अॅड. रोहिदास मुंडे, सचिन पाटील, ज्योती पाटील, अंकिता पाटील, योगेश निकम व प्रकाश पाटील, मयुरी पोंगजी, नीता भगत (मनसे) यांनी केली आहे. या याचिकांच्या सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.