शंभरीच्या उंबरठ्यावरचे ‘कडक’ पंच गहिवरले, माधव गोठोसकर यांना शिवाजी पार्क जिमखान्याचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार
मैदानावर ज्यांच्या एका इशाऱयावर भल्याभल्यांची दांडी गुल व्हायची, ज्यांच्या करडय़ा नजरेसमोर फलंदाजाची पावलं थरथरायची ते कसोटी पंच माधव गोठोसकर आज मात्र गहिवरले. कारण शिवाजी पार्क जिमखान्याने त्यांच्या 58 वर्षांच्या तपश्चर्येला ‘जीवनगौरव’ पुरस्काराचा मानाचा मुजरा केला आणि तोही थेट पुण्यात त्यांच्या निवासस्थानी जाऊन.
कडक शिस्तीच्या गोठोसकरांचा सन्मान करण्यासाठी पुण्यातल्या त्यांच्या घरी शिवाजी पार्क जिमखान्याचे अध्यक्ष दीपक मुरकर, सरचिटणीस संजीव खानोलकर, सहचिटणीस सुनील रामचंद्रन, अजय पाटणकर दाखल झाले. हातात होता जीवनगौरव पुरस्कार. निमित्त होतं जिमखान्याने जाहीर केलेल्या सत्काराचं. प्रकृती अस्वास्थ्यामुळे 97 वर्षांचे गोठोसकर सोहळय़ाला येऊ शकले नव्हते. मग जिमखानाच त्यांच्याकडे चालत गेला आणि आपुलकीने आलेल्या सहकाऱयांना पाहून गोठोसकर गहिवरले.
गेली सहा दशके शिवाजी पार्क जिमखान्यासाठी झटलो. स्पर्धा भरवल्या, शिस्त लावली. सदस्य, कार्याध्यक्ष, अध्यक्ष, विश्वस्त… सगळी नाती निभावली. पण आज त्याच जिमखान्याने आपुलकीने जो सन्मान केला, त्याने मी अक्षरशः भारावून गेलोय. या पुरस्काराने मी धन्य झालो अशा भावना गोठोसकरांनी बोलून दाखवल्या. हे शब्द होते की काळजातून आलेले अश्रू होते, कळत नव्हतं.
जिमखान्याने गोठोसकरांसोबत माजी कसोटीपटू चंदू पाटणकर यांचाही जीवनगौरव पुरस्काराने सन्मान केला होता. पण आजचा दिवस होता गोठोसकरांचा. मुंबई क्रिकेटच्या या ‘कडक शिस्तीच्या शिलेदाराला’ पाहून जिमखान्याचे पदाधिकारीही थक्क झाले. 97 वर्षांचे वय. प्रकृती थोडी थंड. पण स्मरणशक्ती? तिखट मिरचीसारखी. तासभर जुन्या क्रिकेटच्या आठवणींचा खजिना त्यांनी उघडला… प्रत्येक किस्सा, प्रत्येक सामना जणू कालच घडला असावा.
पदाधिकाऱयांच्या भेटींनी ते भारावले. तुमच्या प्रेमाने मी आणखी ठणठणीत झालोय. त्यामुळे नव्याने झळाळी लाभलेल्या जिमखान्याला भेट द्यायला मी लवकरच शिवाजी पार्क गाठणार. याचि देही, याचि डोळा पाहणार. जिमखान्याची देदीप्यमान वाटचाल अशीच सुरू राहो. एवढं बोलून ते थांबले नाहीत, तर त्यांनी ‘जिमखान्याच्या प्रत्येक सदस्याने अभिमानाने सांगावं की, मी शिवाजी पार्क जिमखान्याचा सदस्य आहे’ असे आवाहनही केले.
खरंच, पंचाचा निर्णय अंतिम असतो; पण आज शिवाजी पार्क जिमखान्याने दिलेल्या प्रेमाच्या निर्णयापुढे गोठोसकर नतमस्तक झाले. मैदानावर विकेट काढणारा पंच आज आठवणींच्या मैदानात भावनांनी क्लीन बोल्ड झाले होते.
Comments are closed.