अजित पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत प्रफुल्ल पटेल, तटकरे यांची नावे नाहीत! सुनेत्रा पवार म्हणाल्या…

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अजित पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मात्र, कार्यकारिणीची यादीत प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे, छगन भुजबळ या ज्येष्ठ नेत्यांची नावे नसल्याने राजकीय वर्तुळात याची चर्चा होत होती. आता याबाबत सुनेत्रा पवार यांनी माहिती दिली आहे. या यादीत तांत्रिक चूक असून ती दुरुस्त केली जाईल, असे गटाच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले आहे.

अजित पवार गटाने नुकतंच केंद्रीय निवडणूक आयोगाला राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची नवीन यादी जाहीर केल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचा समावेश नाही. तसेच अजित पवारांच्या दोन्ही मुलांना बढती देण्यात आली आहे. पार्थ पवार यांची नॅशनल जनरल सेक्रेटरी (राष्ट्रीय सरचिटणीस) म्हणून निवड करण्यात आली आहे. तर त्यांचे धाकटे बंधू जय पवार यांची ‘नॅशनल सेक्रेटरी’ (राष्ट्रीय सचिव) म्हणून निवड करण्यात आली आहे.

या यादीत अनेक दिग्गजांना डच्चू देण्यात आला आहे. सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना या यादीत स्थान देण्यात आलेले नाही. यापूर्वी सुनील तटकरे यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीसपदाची महत्त्वाची जबाबदारी होती.

या यादीवरून चर्चा सुरू होताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ट्विट करत ही तांत्रिक चूक असल्याचे म्हटले आहे. प्रसारमाध्यमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची जी यादी फिरत आहे, त्यामध्ये काही तांत्रिक चुका झाल्या आहेत. त्यामध्ये लवकरच सुधारणा करण्यात येईल, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले. या संदर्भात २९ तारखेलाच निवडणूक आयोगाला पत्र दिले असून ही चूक दुरुस्त करण्याची विनंती केली आहे.

Comments are closed.