केकेआरचा सुस्साट विजयरथ रोखण्याचे आरसीबीपुढे आव्हान; अपयशी विराटवर सर्वांचे लक्ष, नरिन ठरू शकतो हुकमी एक्का
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली कोलकाताना नाईट रायडर्सची गाडी सुस्साट निघाली आहे. केकेआरने गेल्या चारही सामन्यांत विजय मिळवला असून त्यांनी आता चांगलाच वेग पकडला आहे. पण आता केकेआरपुढे आव्हान असणार आहे ते आरसीबीचे. त्यामुळे या सामन्यात केकेआरच्या गाडीला ब्रेक लागणार की ती सुस्साट धावणार, याची उत्सुकता सर्वांना असणार आहे.
केकेआरने गेल्या चारही सामन्यांत विजय मिळवत दमदार कमबॅक केले आहे. केकेआरचे आतापर्यंत 10 सामने झाले आहे. या 10 सामन्यांमध्ये त्यांनी 4 विजय मिळवले असून पाच सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे, तर एका सामन्याचा निकाल लागला नव्हता. त्यामुळे केकेआरचे सध्या 9 गुण असून ते आठव्या स्थानावर आहेत. आरसीबीने गेल्या सामन्यात मुंबईला पराभूत करत अव्वल स्थान पटकावले होते. आरसीबीने 11 सामन्यांत सात विजय मिळवले असून त्यांचे चार पराभव झाले आहेत.
विराट कोहली ठरतोय अपयशी…
विराट कोहलीसारखा दिग्गज खेळाडू अपयशी ठरत असल्यामुळे संघाची डोकेदुखी वाढेलली असेल. गेल्या दोन्ही सामन्यांत त्याला भोपळाही फोडता आलेला नाही. पण दुसरा सलामीवीर जेकब बेथेल मात्र भन्नाट फॉर्मात आहे. कर्णधार रजत पाटीदार आणि देवदत्त पडीक्कल उपयुक्त फलंदाजी करत आहेत. गोलंदाजीमध्ये भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड टिच्चून मारा करत आहेत.
केकेआर विजयी पंचकासाठी सज्ज…
केकेआर आता सलग पाचव्या विजयासाठी सज्ज असल्याचे दिसत आहे. फिन ऍलनने गेल्या सामन्यात तुफानी शतक झळकावले होते. अजिंक्य, कॅमेरून ग्रीन आणि अंगक्रिश रघुवंशीही चांगल्या लयीत आहेत. गोलंदाजीमध्ये केकेआरचा संघ अव्वल ठरत आहे. सुनील नरिन अप्रतिम गोलंदाजी करत आहे. सुनीलला अन्य गोलंदाज सुरेख साथ देत असल्यामुळे केकेआर या सामन्यातही विजय मिळवेल, अशी चाहत्यांना आशा आहे.
Comments are closed.