भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण

गुंतवणूकदारांचे सुमारे 11 लाख कोटीचे नुकसान :  पश्चिम आशियातील संकटाचा परिणाम

वृत्तसंस्था/ मुंबई

इराण-अमेरिका युद्ध पुन्हा सुरु होण्याचे संकेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाच्या दुसऱ्या दिवशी देखील शेअरबाजारात मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअरबाजार निर्देशांक सुमारे 1500 अंकांनी खाली आला आहे. तर निफ्टीमध्ये 400 अंकांहून अधिक घसरण दिसून आली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही प्रचंड घसरण झाली आहे. तर दुसरीकडे रुपयाचे मूल्य नीचांकी स्तरावर पोहोचले आहे आणि कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या आहेत.

मंगळवारचा दिवस माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांसाठी सर्वात खराब कामगिरीचा ठरला आहे. बीएसईच्या टॉप 30 पैकी केवळ 3 समभागांमध्ये तेजी दिसून आली. उर्वरित 27 समभाग कोसळले आहेत. अदानी पोर्ट, टीसीएस, टेक महिंद्रा आणि एचसीएल यासारख्या समभागांमध्ये घसरण झाली आहे. या घसरणीमुळे गुंतवणुकदारांचे जवळपास 11 लाख कोटीचे नुकसान झाले आहे, कारण बीएसईचे मार्केट कॅप 467 लाख कोटीवरुन घटत 456 लाख कोटी रुपयांवर आले आहे.

शेअरबाजारात मोठी घसरण का?

-ब्रेंट क्रूड ऑइलचा दर 2.45 टक्क्यांनी वाढून 106.75 डॉलर्स प्रति बॅरल झाला आहे. कच्च्या तेलाच किमतीतील वाढ भारतीय बाजारासाठी नकारात्मक मानली जाते, कारण महागाई वाढू शकते. तसेच कंपन्यांच्या कमाईवरही प्रभाव पडणार आहे.

-अमेरिका-इराण संघर्षावरून नव्या चिंतांदरम्यान गुंतवणुकदारांचा कल कमकुवत राहिला. इराणसोबतचा युद्धविराम स्वत:च्या सर्वात कमजोर टप्प्यात आहे आणि ‘अत्यंत नाजुक स्थिती’त असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

-आयटी क्षेत्राच्या समभागांमध्ये विक्रीचा मोठा दबाव ओपनएआयच्या एका घोषणेमुळे निर्माण झाला. कंपन्यांसाठी एआय तयार करणे आणि तैनात करण्यास मदत करण्यासाठी 4 अब्ज डॉलर्सहून अधिकच्या निधीतून नवी कंपनी सुरू करणार असल्याचे ओपनएआयने म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींच्या आवाहनाची पार्श्वभूमी

पश्चिम आशिया संघर्षादरम्यान इंधन संकट कमी करणे अन् विदेशी चलनाच्या बचतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लोकांना वारंवार आवाहन करण्यात येत आहे. यानुसार एक वर्षापर्यंत सोने खरेदी न करणे आणि वर्क फ्रॉम होमचे आवाहन मोदींनी केल्याचा परिणामही भांडवली बाजारावर दिसून येतोय.

रुपया नीचांकी स्तरावर

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि पश्चिम आशिया तणावावरून चिंतेदरम्यान रुपया अमेरिकन डॉलर्सच्या तुलनेत 35 पैशांनी आणखी कमकुवत झाला आहे. रुपयाचे मूल्य डॉलर्सच्या तुलनेत 95.63 वर पोहोचले आहे. विदेशी चलन बाजारात रुपया डॉलर्सच्या तुलनेत 95.67 वर खुला झाला आणि नंतर 35 पैशांनी मूल्य कमी होत 95.63 वर आला आहे.

Comments are closed.