नालेसफाईवरून सत्ताधारी आक्रमक, विरोधकांचाही प्रशासनावर जोरदार हल्ला; 75 टक्के काम झाल्याचा दावा, मात्र अनेक नाले तुडुंब
मुंबईत 70 ते 75 टक्के नालेसफाई झाल्याचे सांगणाऱया पालिका प्रशासनाविरोधात सत्ताधाऱयांवरच ‘बोंब’ मारण्याची वेळ आली. नालेसफाई पाहणी दौऱ्यात अनेक नाले कचरा, गाळाने तुडुंब भरल्याचे निदर्शनास आल्याचे सांगत सभागृह नेते भाजपचे गणेश खणकर यांनी हरकतीचा मुद्दा मांडून प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी विरोधकांनीही प्रशासनावर जोरदार हल्ला चढवला. सत्ताधारी भाजप-शिंदे गटाला प्रशासन जुमानत नसल्याचे सांगत वस्तुस्थितीच मांडली.
या वर्षी मान्सून लवकर दाखल होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले असताना पावसाळा महिन्यावर आला तरी मुंबईच्या अनेक भागांत अजूनही नालेसफाई सुरूच झाली नसल्याचे खणकर यांनी सांगितले. नाल्यांच्या किनाऱयावर झोपडपट्टय़ा बांधण्यात आल्या आहेत. या रहिवाशांकडून थेट नाल्यात कचरा टाकला जात आहे. नाल्यांच्या किनाऱयांवर मोठय़ा प्रमाणात मलबाही टाकला जात आहे, असे ते म्हणाले. खणकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ाला विरोधकांनीही पाठिंबा दिला. सत्ताधाऱयांकडून राखी जाधव, सईदा खान, शिंदे गटाच्या अंजली नाईक, प्रीती साटम यांनी नालेसफाईची स्थिती बिकट असल्याचे सांगत, आता काय मुंबईकरांनीच स्वतः नालेसफाई करायची का, असा सवाल केला. सत्ताधाऱयांकडून हरीश भांदिर्गे यांनीदेखील कुर्ला, कुर्ला कारशेड, विद्याविहार परिसरात नाले अजूनही तुंबले असल्याचे सांगितले.
बेकायदा झोपडपट्ट्यांवर कारवाई
घाटकोपर येथील नालेसफाई पाहणी दौऱ्यात या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीरपणे झोपडय़ा बांधण्यात आल्याचे प्रभाकर शिंदे यांनी सांगितले. मात्र अशा बेकायदेशीर झोपडय़ांबाबत कोणतीही सहानुभूती न दाखवता तोडकाम कारवाई करण्यात येणार असल्याचेही शिंदे
म्हणाले.
सॅटेलाइट इमेज काढा
नाले आणि नाल्याशेजारी उभारण्यात आलेल्या झोपडपट्टय़ा स्थिती जाणून घेण्यासाठी दहा वर्षांपूर्वीची आणि आताच्या स्थितीची सॅटेलाईट इमेज काढा, असे खणकर म्हणाले. शहरात पुन्हा ‘डॉ. अमरापूरकर’सारख्या घटना घडू, नये यासाठी नालेसफाई प्रभावीपणे करा, असे ते म्हणाले.
- सत्ताधारी आणि विरोधकांनी नालेसफाईच्या आकडेवारीवर जोरदार आक्षेप घेतल्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी याची गंभीर दखल घेत दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराला तुरुंगात
पाठवणार, असे सांगितले.
शिवसेना, मनसे, काँग्रेसने धरले धारेवर
शिवसेनेच्या नगरसेविका श्रद्धा जाधव, यशोधर फणसे यांनीदेखील आपापल्या भागात नालेसफाईची स्थिती बिकट असल्याचे सांगितले. ‘मनसे’चे यशवंत किल्लेदार यांनीदेखील 10 टक्केदेखील नालेसफाई झाली नसल्याचा दावा केला. शिवसेनेच्या मीनाक्षी पाटणकर, काँग्रेसचे अश्रफ आझमी, जमीर कुरेशी यांनीदेखील नालेसफाईवर प्रश्न उपस्थित केले.
Comments are closed.