केअर हेल्थ कंपनीला शिवसेनेचा दणका, ग्राहकाला मिळवून दिले इन्शुरन्सचे पैसे
अटी आणि नियमांचे कारण देत मेडिक्लेमचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीला शिवसेनेने चांगलाच दणका दिला. वर्षानुवर्षे भरमसाट पैसे उकळूनही पॉलिसीचे पैसे न देणाऱ्या कंपनीला शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षाने धारेवर धरत जाब विचारला. अखेर शिवसेनेच्या दणक्यानंतर ताळय़ावर आलेल्या कंपनीने ग्राहकाला मेडिक्लेमचे 1 लाख 99 हजार 380 रुपये मंजूर केले. इन्शुरन्सचे पैसे मिळाल्यानंतर रुग्ण व नातेवाईकांनी शिवसैनिकांचे आभार मानले.
आजारपणात औषध उपचारासाठी आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी सुशील साळवी या ग्राहकाने आईसाठी केअर हेल्थ कंपनीची मेडिक्लेम पॉलिसी काढली होती. काही दिवसांपूर्वी त्यांच्या आईची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांनी तिला रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र केअर हेल्थ कंपनीकडून त्यांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळाले नाही. कंपनीने अटी आणि नियमांचे कारण पुढे करून त्यांचा मेडिक्लेम रद्द केला. हतबल झालेल्या साळवी यांनी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाकडे धाव घेत ही बाब निदर्शनास आणून दिली. याबाबत माहिती मिळताच कक्षाचे अध्यक्ष, शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई व सरचिटणीस निखिल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कक्षाचे अंधेरी विधानसभा संघटक राम साळवी व विलेपार्ले कक्ष विधानसभा संघटक संतोष कदम यांच्या शिष्टमंडळाने कंपनीला दणका देत मेडिक्लेमचे पैसे साळवी यांना देण्यास भाग पाडले. यावेळी उपाध्यक्ष अशोक शेंडे, खजिनदार देविदास माडये, कार्यकारिणी सदस्य बबन सकपाळ, संजय पावले, देवेंद्र भोसले, सत्यवान पवार, विलास सुर्वे आदी उपस्थित होते.
Comments are closed.