हालिवलीत जमिनीचा वाद, आमदार थोरवेंच्या भाच्याचा शेतकरी कुटुंबावर प्राणघातक हल्ला; भूपण बोराडे यांची पोलिसांत तक्रार
शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचा भाचा, कर्जत नगरपालिकेचा नगरसेवक संकेत भासे याने जमिनीच्या वादातून माझ्यावर प्राणघातक हल्ला करून माझ्या वडिलांनाही जबर मारहाण केली आहे, असा आरोप हालिवली येथील शेतकरी भूपण बोराडे यांनी केला आहे. दरम्यान भासे आणि त्याच्या गुंडांकडून झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भूपण बोराडे यांना कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हालिवली ग्रामपंचायत हद्दीतील देवळवाडी परिसरात असलेल्या पेट्रोल पंपासमोरील शेतजमिनीवर मी, माझे वडील रमेश बोराडे आणि भाऊ ऋषिराज बोराडे असे तिघेजण उभे होतो. त्याचवेळी काळ्या रंगाच्या चार गाडीतून संकेत भासे आणि त्याचे गुंड तिथे आले. भासे याने शिवीगाळ करत वाहनातून आणलेल्या लोखंडी हत्याराने माझ्यावर हल्ला चढवला. मला वाचवण्यासाठी वडील मध्ये पडले असताना भासे आणि त्याच्या गुंडांनी त्यांनाही धक्काबुक्की करून जबर मारहाण केली. या हल्ल्यात माझ्या डोक्याला आणि शरीरावर दुखापत झाली. त्यामुळे मी रक्ताच्या थारोळ्यात पडलो. त्यानंतरही भासे आणि त्याच्या गुंडांकडून मला मारहाण सुरूच होती, असा आरोप भूपण बोराडे यांनी केला आहे.
जखमा गंभीर असल्यामुळे भूपण बोराडे यांना अधिक उपचारासाठी कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान पोलिस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोपही बोराडे कुटुंबाने केला आहे.
ठार मारण्याची धमकी
हल्ला करताना संकेत भासे याने जवळील पिस्तूल दाखवत ‘जागा कशी देत नाही ते बघतो, तुम्हाला ठार मारून टाकतो,’ अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप बोराडे कुटुंबाने केला आहे. या हल्ल्यात ओंकार हांडे याचेही नाव पुढे आले आहे. कर्जत पोलिसांनी याप्रकरणी फक्त चौकशी करू नये तर भासे आणि त्याच्या गुंडांवर कडक कारवाई करावी. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भूपण बोराडे आणि त्यांच्या कुटुंबाने केली आहे.
Comments are closed.