अफवांमुळे पंजाब किंग्जची मालकीण प्रीती झिंटा भडकली! म्हणाली, “टीका आणि प्रचार यांमध्ये फरक….”
आयपीएल २०२६ मध्ये सलग चार पराभवानंतर पंजाब किंग्ज सध्या दबावाखाली आला आहे. दरम्यान संघ आणि काही खेळाडूंबद्दल सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांवर फ्रॅंचायजीने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. मंगळवारी (१२ मे) रात्री पंजाब किंग्जच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरील एका पोस्टमध्ये, लोकांना संघ किंवा खेळाडूंबद्दल चुकीची माहिती पसरवण्यापासून परावृत्त होण्याचे आवाहन केले आहे. संघाची सह-मालक प्रीटी झिंटाने ही पोस्ट शेयर केली.
पंजाबने ‘एक्स’वरील ही पोस्ट हटवली आणि एक नवे निवेदन पोस्ट केले, ज्यामधून क्रीडा पत्रकार हा शब्द काढून टाकण्यात आला होता. पंजाबने त्यांच्या आधीच्या पोस्टमध्ये लिहिले, “टीका, थट्टामस्करी आणि मते हे खेळाचा भाग आहेत. पण केवळ प्रसिद्धीसाठी रचलेल्या खोट्या बातम्या आणि बनावट कथानके रचणे हे खेळाचे भाग नाहीत. लक्ष वेधण्यासाठी किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी चुकीची माहिती पसरवण्यापूर्वी सर्वांनी तथ्यांची पडताळणी करावी, असे आम्ही आवाहन करतो.”
पंजाबने नंतर एक नवी पोस्ट शेयर केली, ज्यामधून ‘क्रीडा पत्रकार’ हा भाग वगळला होता. या संपूर्ण प्रकरणावर संघाची सह-मालक प्रीती झिंटाने तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी पंजाबची मूळ पोस्ट शेयर करत लिहिले, “हेतुपरस्पर खोट्या बातम्या पसरवण्याची बाब हलक्यात घेऊ नये. टीका आणि हेतुपरस्पर प्रतार यामध्ये फरक आहे. खेळाबद्दलची योग्य चर्चा स्वागतार्ह आहे, मात्र व्यक्ती, संघ किंवा ब्रॅंड्सना हानी पोहोचवण्यासाठी हेतुपरस्पर खोटे वृत्तांत पसरवणे हे हलक्यात घेतले जाणार नाही. मी सर्व मीडिया व्यावसायिकांना आवाहन करते, की खोटी माहिती पसरवण्याआधी जबाबदारीने वागा, धन्यवाद.”
ऑनलाईन पसरवण्यात आलेल्या माहितीमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे,
संघात बेशिस्तीचे आरोप,
सलामीवीर प्रभसिमरन सिंगने कथितरित्या सात दिवसांत १० किलो वजन वाढवल्याचा आरोप,
काही खेळाडू रात्री गेम खेळण्यात घालवत असल्याच्या बातम्या,
यापैकी कोणत्याही दाव्याला पंजाबने अधिकृत दुजोरा दिला नाही.
नुकतेच प्रभसिमरनची इंस्टाग्राम स्टोरी व्हायरल होत आहे. त्याने शर्टलेस फोटो अपलोड करत सुरू असलेल्या चर्चांना एकप्रकारे उत्तर दिले आहे.
आयपीएल २०२६ ची सुरूवात पंजाबने चांगली केली होती. ते पहिल्या सात सामन्यांमध्ये अपराजित राहिले होते. आता मात्र त्यांनी सलग चार सामने गमावले आहेत. ते सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहेत. त्यांचा पुढील सामना गुरूवारी (१४ मे) मुंबई इंडियन्सविरुद्ध आहे.
Comments are closed.