राज ठाकरे म्हणाले, गुन्ह्याशी माझा संबंध नाही; न्यायाधीशांसमोर ठाणे कोर्टात नेमकं काय घडलं?
ठाणे : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज ठाणे (Thane) न्यायालयात (Court) हजरे लावली होती. 2008 साली घेण्यात आलेल्या रेल्वे भरतीवेळी मनसेच्यावतीने करण्यात आलेल्या आंदोलन प्रकरणाच्या सुनावणीसाठी ठाणे न्यायालयात राज ठाकरे उपस्थित होते. राज ठाकरे या प्रकरणातील इतर सहा जण सुद्धा कोर्टात हजर होते. न्यायालयात राज ठाकरेंचाही जबाब नोंदवण्यात आला असून माझा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही, असे राज यांनी कोर्टात म्हटले. याप्रकरणी, न्यायालयाने पुढची तारीख 18 मे 2026 रोजीची दिली असून राज ठाकरेंना हजर राहण्याची गरज नसल्याचंही त्यांच्या वकिलांकडून सांगण्यात आलं आहे.
2008 साली रेल्वे भरतीदरम्यान कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांना मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण करत रेल्वेचे देखील मोठे नुकसान केलं होतं. “मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्या” असा आरोप करत, राज ठाकरे यांनी आणि मनसे कार्यकर्त्यांनी परप्रांतीयांना या आंदोलनात लक्ष्य केले होते. तसेच, आंदोलनात हिंसाचाराला प्रोत्साहन दिले, असे आरोपही त्यात करण्यात आले होते. या हल्ल्यांच्या प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. राज ठाकरेंसह सात जणांवर गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी, न्यायालयात आज सुनावणी झाली.
न्यायालयात आज, 2008 साली रेल्वेभरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे सोडून इतर कार्यकर्त्यांवर जे आरोप आहेत त्याबद्दल न्यायधीशांकडून जबाब वाचून दाखवण्यात आले. उत्तर भारतीय परीक्षार्थीना मनसे कार्यकर्त्यांनी लाठ्या काठ्याने मारहाण केली, या मारहाणीत परीक्षार्थीना मार लागला, ते जखमी झाले होते, असा जबाब वाचून दाखण्यात आला. त्यानंतर, साक्षीदारांचे जवाब वाचून दाखवण्यात आले. दरम्यान, सुनावणी झाल्यानंतर राज ठाकरेंसोबत याप्रकरणात आरोपी असलेल्या पाच मनसे कार्यकर्त्यांनी कोर्टाबाहेर फोटो काढले
राज ठाकरे म्हणाले, गुन्ह्याशी माझा संबंध नाही
न्यायालयात आज राज ठाकरे आणि इतर पक्ष यांच्या जबानी घेण्यात आल्या आहेत, एकुण 8 जण होते. या गुन्हाशी माझा काहीही संबंध नाही असं राज ठाकरेंनी न्यायालयात सांगितलं, आंदोलनावेळी ते नाशिकला होते. याप्रकरणी, पुढील सुनावणी 18 मे रोजी होणार असून त्यावेळी राज ठाकरेंनी येणं अपेक्षित नाही, असे राज ठाकरेंचे वकिल विजय नांगरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
डिसेंबर महिन्यात झाली होती सुनावणी
दरम्यान, याप्रकरणी याआधीची सुनावणी डिसेंबर महिन्यात झाली होती, ज्यामध्ये आपल्याला गुन्हा कबूल नाही असे राज ठाकरे यांनी कोर्टासमोर म्हटले होते. तसेच, आपण न्यायालयीन प्रक्रियेला संपूर्णपणे सहकार्य करू असेही राज यांनी त्यावेळी कोर्टात म्हटलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा आज कोर्टात ही सुनावणी पार पडली.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.