सलग तिसऱ्या सीझनमध्ये 500+ धावा! साई सुदर्शनने विराटची केली बरोबरी

आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा सलामीवीर साई सुदर्शन याने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. गुजरात टायटन्सकडून खेळताना सुदर्शनने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावत 44 चेंडूत 61 धावा केल्या. त्याच्या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.

या खेळीमुळे सुदर्शन हा आयपीएल 2026 मध्ये 500 धावांचा टप्पा गाठणारा पहिला फलंदाज ठरला. विशेष म्हणजे सलग तीन आयपीएल हंगामांत 500+ धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याने विराट कोहलीची बरोबरी केली आहे. सुदर्शनने 2024, 2025 आणि 2026 या सलग तीन हंगामांत 500 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

याआधी ख्रिस गेल (2011-2013) आणि शिखर धवन (2019-2021) यांनीही सलग तीन वेळा 500+ धावांचा पराक्रम केला होता. या यादीत अव्वल स्थान डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. वॉर्नरने सलग सहा हंगामांत 500+ धावा केल्या आहेत. त्याच्या पाठोपाठ केएल राहुल पाच वेळा हा विक्रम करणारा फलंदाज आहे.

आयपीएलमध्ये सलग सर्वाधिक वेळा 500+ धावा

6 वेळा – डेव्हिड वॉर्नर (2014, 2015, 2016, 2017, 2019, 2020)

5 वेळा – केएल राहुल (2018, 2019, 2020, 2021, 2022)

3 वेळा – ख्रिस गेल (2011, 2012, 2013)

3 वेळा – शिखर धवन (2019, 2020, 2021)

3 वेळा – विराट कोहली (2023, 2024, 2025)

3 वेळा – साई सुदर्शन (2024, 2025, 2026)

सध्या आयपीएल 2026 मधील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सुदर्शन दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 12 सामन्यांत 41.75 च्या सरासरीने 501 धावा केल्या असून त्यात 5 अर्धशतके आणि 1 शतक आहे. त्याच्यापुढे हेनरिक क्लासेन आहे. क्लासेनने 12 सामन्यांत 508 धावा केल्या आहेत.

दरम्यान, सामन्यात गुजरात टायटन्सने दमदार कामगिरी करत सनरायझर्स हैदराबादला 82 धावांनी पराभूत केले. सुदर्शनसोबत वॉशिंग्टन सुंदर यानेही 33 चेंडूत 50 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. गुजरातने प्रथम फलंदाजी करत 5 बाद 168 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादचा डाव अवघ्या 86 धावांत संपुष्टात आला.

गुजरातच्या विजयात कगिसो रबाडा आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी तीन विकेट घेत मोलाचा वाटा उचलला. रबाडाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

Comments are closed.