अमेरिकेचा पाकिस्तानवर विश्वास नाही; मध्यस्थी करायला गेलेले पाकडे तोंडावर आपटले
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धात मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानची भूमिका आता त्यांनाच अडचणीची ठरत असल्याचे दिसत आहे. पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांच्यावर इराणला ‘गुप्त पाठिंबा’ दिल्याचा आरोप अमेरिकेकडून होत आहे. तसेच इराणने याआधीच पाकिस्तान मध्यस्थीमध्ये अमेरिकेची बाजू घेत असल्याचे सांगत पाकिस्तान योग्य मध्यस्थ नसल्याचे म्हटले होता. त्यामुळे पाकिस्तान आता चीन, इराण आणि अमेरिका यांच्या राजनैतिक डावपेचांमध्ये अडकला असल्याचे दिसत आहे.
अमेरिकन प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, पाकिस्तानने इराणी लष्करी विमानांना आपले हवाई तळ वापरण्याची परवानगी दिली होती, असा दावा करण्यात आला. अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी काही इराणी लष्करी विमाने रावळपिंडीतील नूर खान हवाई तळावर उभी करण्यात आली होती. तथापि, पाकिस्तानने हे दावे ‘दिशाभूल करणारे’ आणि ‘खळबळजनक’ असल्याचे सांगून फेटाळून लावले असले तरी अमेरिकेत पाकिस्तानच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
आता या मुद्द्यावर अमेरिकेतही नाराजी दिसत आहे. अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी पाकिस्तानबद्दल उघडपणे अविश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांना प्रश्न विचारला आहे की, जर पाकिस्तान खरोखरच आपल्या हवाई तळांवर इराणी विमानांना जागा देत असेल, तर त्याला निष्पक्ष मध्यस्थ मानले जाऊ शकते का?
सिनेटच्या सुनावणीदरम्यान, सिनेटर लिंडसे ग्रॅहम म्हणाले, माझा पाकिस्तानवर अजिबात विश्वास नाही. जर ते इराणच्या लष्करी मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या हवाई तळांचा वापर होऊ देत असतील, तर आपण मध्यस्थी करण्यासाठी दुसऱ्या कोणालातरी शोधले पाहिजे. शांतता चर्चा थांबण्यामागे हेच कारण असू शकते, असेही ते म्हणाले.
चीन सातत्याने पाकिस्तानला पाठिंबा देत असल्याचे दिसते. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्याशी फोनवर संवाद साधला. या संवादादरम्यान, चीनने पाकिस्तानच्या “मध्यस्थीच्या प्रयत्नांची” प्रशंसा केली आणि इराण-अमेरिका चर्चा पुढे नेण्यात रचनात्मक भूमिका बजावत असल्याचे म्हटले.
होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सध्याच्या तणावाचा चीनच्या ऊर्जा पुरवठ्यावर थेट परिणाम होत आहे. चीन हा इराणच्या तेलाचा एक प्रमुख खरेदीदार आहे. त्यामुळे, बीजिंगला परिस्थिती नियंत्रणात आणायची आहे आणि तेल पुरवठ्याचे सामान्यीकरण सुनिश्चित करायचे आहे. त्यामुळे चीन पाकिस्तानच्या मध्यस्थीला पाठिंबा देत आहे.
पाकिस्तान आता अशा परिस्थितीत सापडला आहे, जिथे एकीकडे त्याला चीनकडून पाठिंबा मिळत आहे, तर दुसरीकडे अमेरिका त्याच्या हेतूंवर शंका घेत आहे. यामुळेच इराण संकटात मध्यस्थी करण्याचा त्याचा प्रयत्न आता एक मोठा राजनैतिक धोका बनत आहे.
Comments are closed.