IPL 2026 – तोंड बंद ठेवा! शर्टलेस फोटो शेअर करत प्रभसिमरन सिंहचे टीकाकारांना उत्तर, नेमकं प्रकरण काय?

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इंडियन प्रीमियर लीगमध्ये सध्या प्ले ऑफ गाठण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. गेल्या आठवड्यापर्यंत टॉपमध्ये असणाऱ्या संघांना मागील काही लढतींमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. यात सर्वात वाईट स्थिती श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सची असून हा संघ सलग चार सामने हरला आहे. त्यामुळे पंजाबची थेट चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. खराब क्षेत्ररक्षण आणि कामगिरीतील असातत्य यामुळे पंजाबची स्थिती वाईट झालेली असतानाच आता सलामीवीर प्रभसिमरण सिंह एका वादात अडकला आहे.

पंजाबचा यष्टीरक्षक बॅटर प्रभसिमरन सिंह याला वाढलेल्या वजनावरून आणि खराब फॉर्मवरून सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. वाढलेल्या वजनामुळे त्याची कामगिरी सुमार होत असल्याची टीका नेटकऱ्यांनी केली. या टीकेला आता प्रभसिमरन याने कडक उत्तर दिले आहे. प्रभसिमरन याने सोशल मीडियावर आपला एक शर्टलेस फोटो शेअर केला असून टीकाकारांची बोलती बंद केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

पंजाब किंग्सचा संघ सध्या सलग पराभवांचा सामना करत आहे. त्यातच प्रभसिमरन सिंहचा फॉर्मही खराब आहे. आयपीएल सुरू असताना प्रभसिमरनचे वजन तब्बल 10 किलोने वाढले आहे आणि त्याचा परिणाम त्याच्या फलंदाजीवर होत आहे, असा दावा सोशल मीडियावर करण्यात आला. यामुळे खुद्द पंबाजची मालकीण प्रीती झिंटा आणि फ्रँचायझीला याचे खंडन करावे लागले.

शर्टलेस फोटो शेअर करत उत्तर

टीकाकारांना उत्तर देण्यासाठी प्रभसिमरनने इंस्टाग्राम स्टोरीचा आधार घेतला. त्याने धर्मशाला येथील आपला एक शर्टलेस फोटो शेअर केला. यात तो अत्यंत फिट दिसत आहे. या फोटोसोबत त्याने ‘तोंड बंद ठेवा’ असा इमोजी वापरला आहे.

पंजाबचा तिसरा सर्वात यशस्वी फलंदाज

दरम्यान, टीका होत असली तरी आकडेवारी काही वेगळंच सांगत आहे. प्रभसिमरन या मोसमात पंजाब किंग्ससाठी सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज आहे. त्याने 169 च्या तुफानी स्ट्राइक रेटने धावा कुटल्या आहेत. गेल्या वर्षी म्हणजेच 2025 च्या हंगामातही त्याने 17 सामन्यांत 549 धावा केल्या होत्या. यंदाच्या हंगामात त्याने आतापर्यंत 11 सामन्यात 382 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 4 अर्धशतकांचा समावेश आहे.

Comments are closed.