महागाईचा भडका,अमूलकडून देशभरात दरवाढ लागू, अमूल दूध उद्यापासून 2 रुपयांनी महागणार
अमूल दूध दरवाढ नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळं कच्चा तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळं गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होईल, अशा चर्चा सुरु होत्या, मात्र अमूलने दूध दरामध्ये वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
अमूलच्या या दूध दरवाढीच्या निर्णयामुळं सर्वसामान्य माणसांच्या खिशावर परिणाम होणार आहे. अमूलच्या दूध दरात वाढ झाल्याचं उद्यापासून पाहायला मिळेल. अमूल या दूधराच्या ब्रँडनं एक लीटर दुधाचे दर 2 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नवे दर 14 मे पासून लागू होणार आहेत.
अमूलकडून ही दरवाढ करताना काही कारणं देण्यात आली आहे. अमूल दुधाच्या ताज्या पिशव्या आणि पॅकेटसवर ही दरवाढ लागू असेल. नवी दरवाढ ही सरासरी अडीच ते साडेतीन टक्के असून सध्याच्या महागाई दराच्या तुलनेत कमी आहे, असं अमूलकडून सांगण्यात आलं आहे.
अमूल ब्रँड हा गुजरात सहकारी दूग्ध विपणन महासंघ यांच्या मार्फत चालवला जातो. या महासंघानं दूधाचा उत्पादन खर्च आणि डेअरी सुरु ठेवण्याचा खर्च अधिक झाल्यानं दरवाढ करण्यात आली आहे, असं सांगितलं. पशूखाद्य, चारा, दूध पॅकेजिंग फिल्म आणि इंधनाच्या दरात वाढ झाल्यानं ही दरवाढ करण अपरिहार्य झालं आहे. या दरवाढीचा थेट फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असं अमूलनं सांगितलं.
गुजरात सहकारी दूग्ध विपणन महासंघाचा अमूल हा मोठा ब्रँड आहे. अमूल ब्रँडद्वारे भारतातील लोक लाखो ग्राहकांपर्यंत दूध आणि डेअरी उत्पादनं पोहोचवण्याचं काम करते.
सोनं चांदी महागली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना काही आवाहनं केली आहेत. त्यात येत्या वर्षभरात सोने- चांदी खरेदी करु नका असं त्यांनी म्हटलं आहे. यानंतर केंद्र सरकारकडून सोने आणि चांदीच्या आयात शुल्कात मोठी वाढ करण्यात आली आहे. सोने आणि चांदीवरील आयात शुल्क 6 टक्क्यांवरुन वाढवून 15 टक्के करण्यात आलं आहे. यामुळं आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचा दर 1 लाख 65 हजार रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीचे दर तीन लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीची चर्चा
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध सुरु झाल्यानंतर एलपीजीच्या तुटवड्यामुळं अनेक गोष्टी आणि वस्तू महागल्या आहेत. आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीची देखील चर्चा सुरु आहे.
आणखी वाचा
Comments are closed.