डहाणूच्या घोळ गावात महावितरणचा ‘घोळ’, विजेचे मीटरच नाही तरी ४८० रुपयांचे बिल ग्राहकाला पाठवले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

विजेचे कनेक्शन घेण्यासाठी ग्राहकाने महावितरणकडे रितसर अर्ज केला. घरात वायरिंगदेखील करून घेतले. त्यानंतर विद्युत मीटर बसवण्यासाठी आवश्यक असलेले शुल्कदेखील भरले. पण दोन महिने उलटूनही मीटर बसवलेच नाही. तरीदेखील महावितरणने ग्राहकाला थेट ४८० 2004 रुपयांचे बिल पाठवून ‘शॉक’ दिला. डहाणूच्या घोळ गावातील महावितरणच्या या घोळाबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

घोळ गावात राहणारे सुहास कदम यांनी नवीन घर बांधल्याने त्यांनी महावितरणकडे वीज जोडणीसाठी ऑनलाइन अर्ज केला होता. तांत्रिक कामे पूर्ण केल्यानंतर विजेचे मीटर बसवण्याकरितादेखील त्यांनी नियमानुसार शुल्क भरले. मीटर बसवण्याबाबत तब्बल दोन महिने वाट बघितली. पण महावितरणचा एकही कर्मचारी फिरकला नाही. घरात प्रत्यक्ष वीज आलेली नसताना आणि मीटर बसवलेले नसतानाही सुहास कदम यांच्या मोबाईल वर मे महिन्याचे बिल येऊन धडकले. एवढेच नव्हे तर घरीदेखील हे बिल पाठवण्यात आले.

अधिकारी म्हणतात चौकशी करू…

४८० रुपयांचे आलेले बिल बघून कदम यांना धक्काच बसला. त्यांनी थेट चारोटी येथील महावितरणचे कार्यालय गाठले व शाखा अभियंता रामकृष्ण फड यांना जाब विचारला. त्यावर त्यांनी सांगितले की, मीटर बसवण्याचे काम अदानी कंपनीला देण्यात आले असून संबंधित प्रकरणाची चौकशी करून आपण योग्य ती माहिती घेऊ. अधिकाऱ्यांच्या या उत्तराने कदम यांना पुन्हा ‘शॉक’ बसला. घोळ गाव व परिसरात महावितरणने यापूर्वीदेखील विजेचे मीटर नसलेल्या सात ते आठ ग्रामस्थांना बिल पाठवल्याचा प्रकार घडला होता. दरम्यान महावितरणच्या गलथान कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे.

Comments are closed.