नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा गोंधळात गोंधळ, शाळा सुरू होणार जूनमध्ये, गणवेश मिळणार ऑगस्टमध्ये
नवी मुंबई महापालिकेचा शिक्षण विभाग आणि सत्ताधारी यांनी घातलेल्या गोंधळामुळे यंदाही महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांना उशिराने गणवेश मिळणार आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळणार नसल्याने या विद्यार्थ्यांचा हिरमोड होणार आहे. गणवेश तयार करण्याचा ठेका जुन्याच ठेकेदाराला देण्याचा प्रस्ताव मंगळवारी स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आला. शाळा सुरू होण्यास फक्त एक महिन्याचा कालावधी उरलेला आहे. इतक्या उशिरा प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना नवीन गणवेश जूनऐवजी ऑगस्ट महिन्यात उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गणवेश तयार करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने एप्रिलच्या महासभेत पटलावर आणला. हे गणवेश शहरातील महिला बचत गटांकडून शिवून घेण्याचे नियोजन प्रशासनाने केले होते. मात्र बचत गटांना या कामाचा अनुभव नसल्याचे कारण पुढे करीत सत्ताधाऱ्यांनी या प्रस्तावाला विरोध करून जुन्याच ठेकेदाराला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. ही मुदतवाढ लवकरात लवकर मार्गी लावणे आवश्यक होते. मात्र शिक्षण विभाग आणि प्रशासनाने पुन्हा दिरंगाई करून हा प्रस्ताव मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत पटलावर ठेवला. सुमारे १३ कोटी रुपये खर्चाच्या या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
टेंडर प्रक्रियेला उशीर झाला
नवी मुंबई महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा वेळेत गणवेश उपलब्ध व्हावेत याकरिता प्रशासनासहित सर्व लोकप्रतिनिधी आग्रही आहेत, परंतु यंदाच्या वर्षी प्रशासनाकडून टेंडर प्रक्रियेला उशीर झाला आहे. मात्र पुढच्या वर्षी विद्यार्थ्यांना वेळेवर गणवेश मिळेल याची दक्षता घेतली जाईल, अशी प्रतिक्रिया स्थायी समितीचे सभापती अशोक पाटील यांनी व्यक्त केली आहे.
Comments are closed.