Nanded news – काँग्रेस नेत्याच्या वाढदिवसाला भाषण करणं महागात पडलं, पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांची बदली
काँग्रेस नेते रामदास पाटील सुमठाणकर यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांनी भाषण केले होते. या भाषणात मुंडे यांनी त्यांना मुख्यमंत्री होण्याच्या शुभेच्छा दिल्या. हे भाषण आता त्यांना चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणाची चौकशी करून त्यांची पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी बोलमवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते रामदास पाटील सुमठाणकर यांच्या वाढदिवसानिमित्त देगलूरमध्ये मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वाढदिवसाचा कार्यक्रम असला तरी वातावरण निवडणूक सभेलाही लाजवेल असेच होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी भाषण करताना उत्साहाच्या भरात सुमठाणकर यांना थेट भविष्यात मुख्यमंत्री व्हा असा आशीर्वाद देऊन टाकला. यामुळे उपस्थित नेते मंडळींचे डोळे विस्फारले.
कार्यक्रम संपला, केक कापला, टाळ्या वाजल्या, भाषणेही झाली, पण खरी फटाकेबाजी नंतर झाली. भाषणाचा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा स्फोट झाला. पोलीस अधिकारी राजकीय विधान केल्याने या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. चौकशीनंतर बुधवारी मध्यरात्री दरम्यान प्रशासनानेही वेळ न दवडता आपली शैली दाखवली आणि मुंडे यांची बदली केली.
रात्री जिल्हा विशेष शाखेत कार्यरत पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड यांनी देगलूर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला. मारुती मुंडे यांना जिल्हा नियंत्रण कक्षात बोलावण्यात आले आहे.
Comments are closed.