मालदारांच्या विवाहात दोन हार, एक बुके, पाच वऱ्हाडी; पैशांची वारेमाप उधळपट्टी करणाऱ्यांसमोर ठेवला आदर्श

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

>> सुनील उंबरे

अलीकडे लग्न सोहळा म्हणजे एक वेगळाच थाट झाला आहे. प्रिशूट वेडिंगपासून त्याची सुरुवात होते ते प्रत्यक्ष विवाहापर्यंत… यासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी केली जाते. वारेमाप खर्च करण्याची चढाओढ लागलेली असताना, सोलापूर जिल्ह्यातील पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी आपल्या मुलीनंतर पुतणीचा विवाह नोंदणी पद्धतीने करून पैशांची वारेमाप उधळपट्टी करणाऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

आमदार सावंत यांचे बंधू ब्रह्मदेव अच्युतराव सावंत यांची कन्या तेजश्री आणि ज्येष्ठ पत्रकार घनश्याम गणपत शिंदे यांचे सुपुत्र अथर्व यांचा विवाह सोलापूर येथील सरकारी विवाह नोंदणी कार्यालयात मंगळवारी (दि. १२) साध्या पद्धतीने पार पडला. या विवाहाप्रसंगी दोन्ही कुटुंबांतील मोजकेच सदस्य उपस्थित होते. बँडबाजा, वरातीशिवाय आणि अनावश्यक गाजावाजा न करता पार पडलेल्या या विवाहाने तरुणाईसमोर एक आदर्श उभा केला आहे.

नवरा अथर्व आणि नवरी तेजश्री दोघेही उच्चशिक्षित आहेत. दोन्ही कुटुंबांनी विवाह साध्या पद्धतीने करावा, असा प्रस्ताव मांडला. नवरा-नवरीने क्षणाचाही विलंब न लावता नोंदणी पद्धतीने विवाहास सहमती दर्शविली. आजच्या काळात बडेजाव आणि दिखाव्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात, मात्र या नवदाम्पत्याने लग्नाचा अवाजवी खर्च टाळण्याचा आदर्शवत निर्णय घेतला. विवाह सोहळ्यासाठी होणारा अनावश्यक खर्च वाचवून, तो पैसा समाजातील गरजू घटकांसाठी किंवा समाजोपयोगी कामांसाठी वापरण्याचा संकल्प केला आहे.

माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कुटुंबातील हा दुसरा विवाह नोंदणी पद्धतीने पार पडला आहे. शिक्षण क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्त्व असलेल्या सावंत यांनी आपल्या कृतीतून समाजाला आरसा दाखवला आहे. केवळ भाषणातून नाही, तर स्वतःच्या घरातून बदलाची सुरुवात केल्याने हा सोहळा चर्चेचा विषय ठरला आहे. सावंत आणि शिंदे कुटुंबाच्या या निर्णयामुळे ‘साधे लग्न, आदर्श लग्न’ ही संकल्पना पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

Comments are closed.