Nanded News – गिरीजा स्विमिंग पूलमध्ये बुडून नऊ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शहरातील नव्याने सुरू करण्यात आलेल्या गिरीजा वॉटर स्विमिंग पूलमध्ये एका नऊ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात असून स्विमिंग पूलमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सक्षम नागोराव गायकवाड (9) हा बालक मित्रांसोबत भिसीवरून पोहण्यासाठी गिरीजा वॉटर स्विमिंग पूलमध्ये आला होता. पोहत असताना अचानक तो पाण्यात बुडाला. काही वेळानंतर उपस्थितांच्या लक्षात ही बाब येताच परिसरात एकच गोंधळ उडाला. नागरिकांनी तात्काळ बालकाला पाण्याबाहेर काढून उपचारासाठी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करून सक्षमचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

या घटनेनंतर बालकाच्या कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला. स्विमिंग पूल परिसरात कोणतीही योग्य सुरक्षा व्यवस्था नसल्याचा आरोप मृत बालकाच्या आईने केला आहे. पूल परिसरात प्रशिक्षित लाईफगार्ड, सुरक्षा साधने किंवा लहान मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचारी नसल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी स्विमिंग पूलकडे धाव घेतली. या घटनेमुळे शहरात शोककळा पसरली असून संबंधित स्विमिंग पूल प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

Comments are closed.