Yavatmal crime news – हैदराबादमध्ये लपलेले घरफोडीतील आरोपी जेरबंद; साडे सात लाखांचा मुद्देमाल जप्त, उमरखेड पोलिसांची मोठी कारवाई

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

उमरखेड तालुक्यातील राजापूर (टाकळी) येथे झालेल्या एका मोठ्या घरफोडीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. उमरखेड पोलिसांनी अत्यंत चातुर्याने तपास चक्र फिरवत दोन आरोपींना थेट हैदराबाद येथून अटक केली. त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आणि मोटारसायकल असा एकूण 7 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राजापूर येथील रहिवासी वनिता मोहिते या काही कामानिमित्त बाहेरगावी गेल्या होत्या. हीच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील 1.20 लाखांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते. या धाडसी चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

घटनेचे गांभीर्य ओळखून उमरखेड पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान केली. सीसीटीव्ही फुटेज, सीडीआर (CDR) आणि सायबर सेलच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना आरोपींचा माग लागला. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हैदराबादमध्ये लपून बसल्याचे निष्पन्न झाले. तात्काळ डीबी पथकाने हैदराबाद गाठून मनोहर चव्हाण याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या साथीदारासह गुन्ह्याची कबुली दिली.

ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमान गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ, यशोधरा मुनेश्वर आणि सायबर सेल यवतमाळ यांच्या नेतृत्वाखालील डीबी पथकाने ही कामगिरी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे करत आहेत.

Comments are closed.