महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; राखीव कोट्यातील उमेदवारांना आता खुल्या प्रवर्गातील नोकऱ्या मिळणार नाहीत
राखीव कोट्यातील उमेदवारांना आता खुल्या प्रवर्गातील नोकऱ्या मिळणार नाहीत. महाराष्ट्र शासनाने आज हा मोठा निर्णय घेतला. स्पर्धा परीक्षेत राखीव प्रवर्गासाठीच्या असलेल्या सवलती घेणाऱ्या उमेदवारांना खुल्या वर्गासाठी असलेल्या जागांवर दावा करता येणार नाही. अशा उमेदवारांची नियुक्ती केवळ राखीव प्रवर्गातील रिक्त जागांवरच केली जाणार आहे. यामुळे सवलती घेणाऱ्या उमेदवारांना फटका बसणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. सर्व सरळसेवा भरती, शिक्षक भरती आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) होणाऱ्या परीक्षांमध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि परीक्षेस बसण्याची संधी अशा सवलती दिल्या जातात. त्या सवलती घेणाऱ्या उमेदवारांकडून नंतर खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या जागांवरही दावा केला जातो. आता तो पर्यायच शासनाने बंद केला आहे.
सवलत न घेतलेल्या उमेदवारांना संधी कायम
राखीव प्रवर्गातील ज्या उमेदवारांनी निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर पात्रतेच्या निकषांमध्ये कोणतीही सवलत घेतलेली नाही, अशा उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गातूनही करण्यात येईल, असेही शासनाने स्पष्ट केले आहे. या सवलतींमधून परीक्षा शुल्क मात्र वगळण्यात आले आहे.
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना अधिक संधी
शासनाच्या या निर्णयामुळे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठीच्या जागांवर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांची स्पर्धा कमी होऊन खुल्या गटातील उमेदवारांना अधिक संधी मिळणार आहेत. दुसरीकडे मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये या निर्णयामुळे प्रशासनातील संधी हुकतील अशी भीती निर्माण झाली आहे.
- गुणवत्ता यादीत जास्त गुण असूनही खुल्या प्रवर्गातील जागा मिळणार नाही
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी शासनाने दिलेली कोणतीही सवलत घेतली असेल अशा उमेदवारांची गणना संबंधित राखीव प्रवर्गातच करण्यात येणार आहे.
- निवड फक्त मूळ आरक्षित कोट्यातूनच होईल. तसे धोरण राज्य शासनाने बनवले असून आज त्या धोरणाला मान्यता देण्यात आली.
Comments are closed.