IPL 2026 – पंजाबला हारपंच… सलग पाचव्या सामन्यांत किंग्जला धक्का, मुंबईच्या जखमेवर विजयाची फुंकर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महिनाभर आयपीएल गुणतालिकेत सरपंचासारखा मिरवत असलेल्या पंजाबला सलग पाचव्या पराभवाचा जबर पंच बसला. स्पर्धेतून बाद झालेल्या मुंबईला हरवून प्ले ऑफमध्ये आपली जागा पक्की करण्यासाठी उतरलेल्या पंजाबला मुंबईच्या तिलक वर्माने जोरदार ठोसा लगावत सनसनाटी निर्माण केली. मुंबईने एक चेंडू राखून विजय नोंदवताना पंजाबचा खाना खराब केला. सलग पाचव्या पराभवामुळे पंजाबवर साखळीतच बाद होण्याची टांगती तलवार लटकली आहे. मुंबईच्या विजयामुळे दिल्लीसह आठही संघाचे प्ले ऑफ स्वप्न अद्याप जिवंत आहे.

विजयाचे २०१ धावांचे आव्हान स्वीकारून मुंबईची रायन रिकल्टन आणि रोहित शर्मा जोडी मैदानात उतरली, पण अर्शदीपने पहिल्या षटकांतच रोहित शर्माला अक्षरशः बांधून ठेवले. केवळ २ धावा देत अर्शदीपने भन्नाट सुरुवात केली, पण त्यानंतर रिकल्टनने ४८ धावा फोडून काढल्या. तोच पहिला बाद झाला. मागोमाग रोहितची खेळी २५ धावांवर संपली. धीरनेही ९ धावा केल्या. त्यानंतर तिलक वर्माने खणखणीत फलंदाजी करत मुंबईला विजयाच्या रेषेत आणले. तिलकने शेरफन रुदरफोर्डसह ६१ धावांची भर घातली.

अखेरच्या ३ षटकांत ५० धावांचे जबर आव्हान असताना तिलक आणि विल जॅक्सने मार्को यान्सनला २२ धावा चोपून काढत सामना मुंबईच्या बाजूने फिरवला. त्यानंतर झेव्हियर बार्लेटला ३ षटकार खेचत या जोडीने मुंबईच्या नॉकआऊट दुःखावर विजयाची फुंकर मारली. ३३ चेंडूंत ६ षटकार आणि तितकेच चौकार खेचत नाबाद ७५ धावा करणारा तिलकच सामनावीर ठरला.

तत्पूर्वी पंजाब किंग्जच्या प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग या युवा जोडीने जोरदार सुरुवात केली, पण प्रियांशची खेळी २२ धावांवरच संपली. पुढे प्रभसिमरनने धुवांधार फटके मारत स्वतःचे अर्धशतक आणि संघाचे शतक साकारले. त्याने कूपर कोनोलीसह ५७ धावांची भागीसुद्धा रचली. मात्र पंजाबच्या डावाला १२ व्या षटकांत नजर लागली. शार्दुल ठाकूरने भन्नाट मारा करताना आधी प्रभसिमरन-कोनोलीची जोडी फोडली. दुसऱ्या चेंडूवर प्रभा आणि चौथ्या चेंडूवर अय्यरला ड्रेसिंगरूममध्ये धाडले. ३ चेंडूंत २ विकेट टिपल्याने ठाकूरची कॉलर टाइट झाली. पुढच्याच षटकांत कोनोलीची यष्टी बावाने वाकवली. मग सलगच्या षटकांत सूर्यांश शेडगे (८), शशांक शर्मा (२) आणि मार्को यान्सन (२) यांच्याही विकेट काढल्या गेल्या. परिणामतः पंजाबची ७ बाद १४० अशी बिकट अवस्था झाली.

पंजाबचे धडाधड सहा विकेट अवघ्या ३३ धावांत उखडल्यानंतर मुंबईला डावावर नियंत्रण मिळवण्याची संधी होती. पण अझमतुल्लाह ओमरझईने १७ चेंडूंत ४ षटकार खेचत ३८ धावा काढल्या. मग विष्णू विनोद आणि झेव्हियर बार्टलेट यांनी २ षटकार आणि ३ चौकार लगावत २ षटकांत ३४ धावा फटकावत संघाला २०० हा जादुई आकडा ओलांडून दिला. ठाकूरने ३९ धावांत ४ विकेट टिपत सर्वोत्तम कामगिरी केली.

Comments are closed.