IPL 2026 – एक दिवस हे सर्व संपणार आहे… विराट कोहली शतकानंतर झाला भावुक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

विराट कोहलीला ‘चेस मास्टर’ का म्हटले जाते हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले. केकेआरविरुद्धच्या सामन्यात कोहलीने १७५ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत ६० चेंडूंमध्ये नाबाद १०५ धावा केल्या. विराटने आपल्या खेळीत ११ चौकार आणि ३ षटकार मारले. या शानदार खेळीनंतर कोहलीने एक भावनिक विधानही केले.

विराट कोहलीचे भावनिक विधान रायपूरमधील आपल्या विजयी खेळीनंतर विराट कोहली म्हणाला, ‘मला फलंदाजी करायला आवडते. एवढं सगळं होऊनही मला असंच वाटतं. या स्तरावर खेळणे हा एक सन्मान आहे. जगातील सर्वोत्तम खेळाडूंशी स्पर्धा करणे हा एक मोठा सन्मान आहे. मी हे आयुष्यभर करत आलो आहे. क्रिकेट हेच माझे खरे प्रेम आहे आणि मी मैदानावर माझे सर्वस्व देतो. मग मी क्षेत्ररक्षण करत असेन किंवा फलंदाजी, कारण एक दिवस हे सर्व संपणारच आहे.’

विजय साजरा करणे मोठे नव्हते विराट पुढे म्हणाला की, ‘विजय साजरा करणे फार मोठे नव्हते. कारण आम्हाला गुणांचे महत्त्व माहीत आहे. संघासाठी अधिक योगदान देण्याचा हा एक जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे. गेल्या दोन सामन्यांत मी धावा करू शकलो नाही ही गोष्ट मला आतून पोखरत होती, कारण मी खूप चांगला खेळत होतो. ही गोष्ट तुम्हाला त्रास देते. कारण सर्वोत्तम कामगिरी करणे हेच ध्येय होते. शतक होवो वा न होवो, सामना संघाला जिंकवणे ही अधिक महत्त्वाची गोष्ट आहे.’

दबाव ही चांगली गोष्ट आहे…
विराट म्हणाला की, ‘लोक म्हणतात की दबाव ही एक संधी आहे. यामागे एक कारण आहे. दबाव तुम्हाला नम्र ठेवतो. चांगला दबाव नेहमीच तुमचा खेळ सुधारण्यास मदत करतो. जेव्हा काही सामने तुमच्या मनासारखे होत नाहीत तेव्हा तुम्हाला थोडी धाकधूक वाटते आणि त्याचा तुम्हाला फायदा होतो.
मला त्या गोष्टीचा सर्वात जास्त आनंद…

सामना संपल्यावर विराटने सांगितले की, ‘मी माझ्या खेळावर विश्वास ठेवू शकलो याचा मला आनंद आहे. विक्रम होत राहतात, पण फलंदाजीचा आनंद घेणे हे मला महत्त्वाचे वाटते. जिथे माझ्यावर थोडा दबाव असतो तिथे मी स्वतःला आव्हान देऊन पूर्ण ताकदीने खेळतो. खेळ तुम्हाला एक व्यक्ती म्हणून खूप काही शिकवतो. एवढ्या वर्षांनंतरही खेळावरचे प्रेम कायम आहे. मला बॅटच्या मधोमध चेंडू मारायला खूप आवडतं. तो आनंद आजही कायम आहे आणि हे सर्व देवाच्या कृपेमुळेच आहे आणि मी त्यासाठी आभारी व कृतज्ञ आहे.’

Comments are closed.