मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर तीन वाहने एकमेकांवर धडकली; अपघातात दोघांचा मृत्यू, दोन जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दोन ट्रक आणि कंटेनरच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या मार्गिकेवर किलोमीटर 38 च्या दरम्यान शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता हा अपघात झाला. मयत आणि जखमींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, प्रशासकीय पथकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

अपघातात एका ट्रकमधील चालक व क्लिनर दोघांचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या ट्रकचा चालक आणि कंटेनर चालक जखमी झाले आहेत. खोपोली बायपासजवळ ढेकू गावाच्या हद्दीत तीव्र उतारावर रंगाचे डबे घेऊन जाणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडला. या अपघातामुळे द्रुतगती महामार्गावर एक तास वाहतूक ठप्प झाली होती.

जखमींना कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रकमधील सामान आणि पेंट सदृश्य साहित्य रस्त्यावर विखुरल्याने महामार्गावरील पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली. महामार्गावरील फक्त एकच लेन सुरू आहे.

Comments are closed.