अखेर इंधन दरवाढीचा मुहूर्त साधला आहे.
पेट्रोल-डिझेल दरात प्रत्येकी 3 रुपये वाढ : जागतिक बाजारात तेलदर वाढल्याने निर्णय
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सार्वजनिक तेलशुद्धीकरण कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरात प्रत्येकी 3 रुपये प्रतिलिटरची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ त्वरित म्हणजेच शुक्रवारपासूनच लागू करण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांमध्ये प्रथमच या कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल यांची दरवाढ केली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या इंधन तेलाचे तर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे भारतातही दरवाढ करणे क्रमप्राप्त आहे, असे स्पष्टीकरण देण्यात आले.
या निर्णयामुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कमी-अधिक प्रमाणात वाढ होणार आहे. ही वाढ सर्वत्र समान असणार नाही. प्रत्येक राज्यातील कर आणि वाहतूक खर्च आदी जमेस धरुन प्रत्येक स्थानी भिन्न दर असतील. मात्र, ही वाढ साधारणत: 3 रुपये ते 5 रुपये या मर्यादेत राहण्याची शक्यता आहे.
कच्च्या तेलाच्या दरात वाढ
भारतासह अनेक देशांना तेलपुरवठा इराणनजीकच्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून केला जातो. तथापि, आखाती संघर्षात या मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत. इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांनी ही सामुद्रधुनी आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न चालविला आहे. परिणामी, या मार्गाने होणारा तेलपुरवठा जवळपास 80 टक्के घटला आहे. कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली असून या संघर्षापूर्वी 60 डॉलर प्रतिबॅरल असणारे तेल आता 100 ते 110 डॉलर प्रतिबॅरलने विकले जात आहे. त्यामुळे प्रत्येक देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर 30 ते 50 टक्के वाढले आहेत. त्यामानाने भारतातील वाढ प्रमाण बरेच कमी आहे.
विव्रेत्या कंपन्यांना फटका
कच्च्या तेलाचे दर भडकल्याने भारतातील तेल विक्री कंपन्यांना पेट्रोल विक्रीत प्रतिलिटर 14 रुपये, तर डिझेल विक्रीत प्रतिलिटर 42 रुपये तोटा होत आहे,. इतका मोठा तोटा अधिक काळ सहन करणे शक्य नाही, असे या कंपन्यांचे म्हणणे आहे. हा तोटा या दरवाढीमुळे काही प्रमाणात भरून निघणार असला, तरीही तो पूर्णपणे पुसला जाणार नाही, अशीही प्रतिक्रिया कंपन्यांनी व्यक्त केली.
नफा-तोट्याचा हिशेब
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधन तेलाच्या दरात घट होते, तेव्हा भारतातील तेल कंपन्यांना मोठा लाभ होतो. तसेच तेलदर वाढतात तेव्हा कंपन्यांना तोटा सहन करावा लागतो. तेलदरात घट आणि वाढ विशिष्ट मर्यादेत असेल, तर तेल कंपन्या तोटा सोसू शकतात. मात्र, मध्यपूर्वेतील संघर्ष अपेक्षेबाहेर लांबल्याने तेलदर सातत्याने 100 डॉलरच्या वर राहिले आहेत. अशा स्थितीत देशात दरवाढ करणे भाग आहे, असे केंद्र सरकार आणि खनिज तेल शुद्धीकरण कंपन्यांचे म्हणणे आहे.
विरोधी पक्षांची टीका
पेट्रोल-डिझेल दरवाढीवर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे. निवडणुका झाल्यानंतर त्वरित केंद्र सरकारने वसुलीला प्रारंभ केला, अशी टीका काँग्रेसने केली. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे जीवन असह्या होणार आहे. डिझेलच्या दरात वाढ झाल्याने वाहतूक महागणार असून परिणामी, सर्वच वस्तूंच्या दरांमध्ये वाढ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला त्रास देण्यात धन्यता मानत आहेत, अशा अर्थाची टीका बहुतेक सर्व विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे.
दरवाढ नियंत्रणाचे प्रयत्न
पेट्रोल आणि डिझेल यांची दरवाढ मोठ्या प्रमाणावर होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने आधीपासून प्रयत्न केले आहेत. एक महिन्यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादनशुल्कात प्रत्येकी 10 रुपये प्रतिलिटर प्रमाणे कपात करण्यात आली आहे. यामुळे केंद्र सरकारचे उत्पन्न कमी झाले. केंद्र सरकारलाही उत्पन्न मोठ्या प्रमाणात कमी होऊ देणे शक्य नाही, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.
तेलदरवाढीचा निर्णय
ड चार वर्षांच्या नंतर प्रथमच देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ
ड सार्वजनिक तेल कंपन्यांना सातत्यपूर्ण तोटा होत असल्याने झाला निर्णय
ड राज्यांचे कर लागू होत असल्याने प्रत्येक राज्यात दरांचे प्रमाण वेगवेगळे
ड केंद्र सरकार जनतेची लूट करीत असल्याचा विरोधी पक्षांकडून आरोप
Comments are closed.