क्रीडानगरीतून – राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा – मुंबई, कोल्हापूर उपांत्य फेरीत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुंबईसह कोल्हापूर व लातूर विभागाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. 18 वर्षांखालील मुलांच्या गटात कोल्हापूर संघाने पहिला  सेट गमावून 26-28,25-21,15-12 गुणांनी मुंबईला हरवून मैदान गाजवले. 21 वर्षांखालील मुलीच्या गटात मुंबईने पुणे संघावर 25-19, 25-19 गुणांनी मात केली. याच गटात नागपूरने संभाजीनगरला 25-5, 25-6 एकतर्फी पराभूत केले. लातूर संघाने 18 वर्षांखालील मुलांच्या पुणे संघाला 25-19, 25-21 गुणांनी विजय मिळवला. 21 वर्षांखालील मुलीच्या गटात मुंबईने सलग दुसरा विजय संपादन केला. पुणे विभागाला 17-25, 25-22, 15-8 गुणांनी पराभूत करीत मुंबईने पहिला सेट गमवूनही विजयश्री खेचून आणली.

अखिल हिंदुस्थानी कुस्ती स्पर्धाः प्रतीक, बालाजी उपांत्य फेरीत

आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू प्रतीक देशमुख, बालाजी मेटकरी, इम्रान मुजावर, मुंतजीर  सरनोबत यांनी आपल्या उपांत्यपूर्व लढती सहज जिंकत बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई शहर तालीम संघटना आयोजित अखिल हिंदुस्थानी मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धेत आगेकूच कायम राखली. प्रतीक देशमुखने ठाण्याच्या विपुल परबला तांत्रिक चितपटीने 10-0 असा मोठा विजय मिळवला. अन्य लढतीत सांगलीच्या इम्रानने सोलापूरच्या वैभव मानेला चीतपट करत स्पर्धेतील आगेकूच कायम राखली. मुंताजोरने चीतपट करत सोलापूरच्या सचिन काळेचे आव्हान संपुष्टात आणले. बालाजी मेटकरीने 5-3 अशा गुणांनी विनायक बजबळ विजय मिळवला. कुमार केसरी गटाच्या चुरशीच्या लढतीत विवेक पाटीलने हर्षवर्धन जाधवचा 5-4 असा एक गुणाने विजय मिळवला.

व्यावसायिक खो-खो स्पर्धेतदिग्गज संघांची विजयी सलामी

मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्पोर्ट्स क्लब आयोजित व्यावसायिक निमंत्रित खो-खो स्पर्धेत आज झालेल्या सामन्यांत बँक ऑफ इंडिया, महावितरण कंपनी, नेव्हल डॉक आणि मुंबई पोलीस यांनी दमदार विजय नोंदवत विजयी सलामी दिली.  पहिल्या सामन्यात बँक ऑफ इंडियाने बृहन्मुंबई महानगरपालिकेचा 19-17 (मध्यंतर 10-10) असा चुरशीच्या लढतीत 2 गुणांनी पराभव केला. तिसऱया सामन्यात नेव्हल डॉकने ठाणे स्पेशल पोलीस सेलचा 10-9 (मध्यंतर 8-5) असा 7.10 मि. राखून पराभव करत शानदार विजय नोंदवला. दिवसातील चौथ्या सामन्यात मुंबई पोलिसांनी यजमान रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया संघावर 17-15 (मध्यंतर 9-9) असा 2 गुणांनी थरारक विजय मिळवला. मध्यंतराला सामना बरोबरीत असल्याने प्रत्येक क्षण रोमांच वाढवत होता. अखेरीस पोलिसांच्या अचूक डावपेचांमुळे त्यांनी विजय खेचून आणला.

Comments are closed.