सनातनबाबत केलेल्या वक्तव्यावर उदयनिधी यांची प्रतिक्रिया
जातीव्यवस्था संपुष्टात आणण्याचा होता आशय
वृत्तसंस्था/ चेन्नई
द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी तामिळनाडू विधानसभेत सनातन धर्मावरून केलेल्या वक्तव्याचा बचाव केला आहे. याप्रकरणी वाद उभा ठाकल्यावर उदयनिधी यांनी माझ्या वक्तव्याचा अर्थ लोकांना जातींमध्ये विभागणाऱ्या व्यवस्थेला संपुष्टात आणणे होता अशी सारवासारव उदयनिधी यांनी केली आहे.
जातीव्यवस्था संपुष्टात आणण्याचा अर्थ कुणी मंदिरात जाणार नाही असा नाही. सर्व लोकांना मंदिर तसेच पूर्ण समाजात समान अधिकार मिळावेत, असा याचा अर्थ आहे. तामिळनाडू विधानसभेत मी लोकांना विभागणाऱ्या जातीव्यवस्थेला संपविण्याबद्दल बोललो होतो. काही लोक याप्रकरणी माझ्यावर टीका करत आहेत. परंतु घाबरून जाणारा मी नाही. द्रविड आंदोलन विरोधातूनच जन्माला आले आहे. मी कुठल्याही देवावरील विश्वासाच्या विरोधात नाही, परंतु असमानता आणि छळाला कठोर विरोध आहे, असे उद्गार उदयनिधी यांनी काढले आहेत.
आम्ही हिंदुत्वाच्या विरोधात : आधव
टीव्हीकेचे महासचिव आणि तामिळनाडूचे मंत्री आधव अर्जुन यांनी उदयनिधीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आमचा पक्ष हिंदूंच्या विरोधात नाही, तर ‘हिंदुत्वाच्या राजकारणा’च्या विरोधात आहे. उदयनिध्मी यांना बहुधा सनातन धर्माबद्दल पूर्ण ज्ञान नसावे. उत्तर भारतात सनातन धर्माला हिंदूधर्माच्या रुपात पाहिले जाते. परंतु तामिळनाडूच्या सामाजिक आणि राजकीय संदर्भात याला ‘असमानते’शी जोडून पाहिले जाते. आम्ही हिंदूंच्या विरोधात नाही, तर हिंदुत्वाच्या विरोधात आहोत असे आधव यांनी म्हटले आहे.
Comments are closed.