रिषभ पंतला मोठा दणका! चेन्नईवर विजय मिळवताच बीसीसीआयने ठोठावला 12 लाखांचा दंड
लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार रिषभ पंत याला मोठा दणका बसला आहे. बीसीसीआयने आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पंतवर 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात संथ षटकगती राखल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
आयपीएलने जारी केलेल्या निवेदनानुसार, लखनऊच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर झालेल्या सामन्यात लखनऊ संघाने निर्धारित वेळेत षटके पूर्ण केली नाहीत. आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.22 अंतर्गत ही संघाची यंदाच्या मोसमातील पहिली चूक असल्याने कर्णधार पंतवर 12 लाख रुपयांचा दंड लावण्यात आला.
दरम्यान, मैदानावर मात्र लखनऊ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्जला 7 गडी राखून पराभूत केले. या पराभवामुळे चेन्नईच्या बाद फेरीच्या आशांना मोठा धक्का बसला आहे.
प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 5 बाद 187 धावा केल्या. युवा फलंदाज कार्तिक शर्मा याने 42 चेंडूत 71 धावांची शानदार खेळी केली. त्याला डेवाल्ड ब्रेविस (25) आणि शिवम दुबे (नाबाद 32) यांची चांगली साथ मिळाली.
188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मिचेल मार्शने चेन्नईच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. मार्शने फक्त 38 चेंडूत 90 धावांची तुफानी खेळी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. त्याने 9 चौकार आणि 7 षटकार ठोकले. जोश इंग्लिश याच्यासोबत त्याने पहिल्या गडीसाठी 135 धावांची भागीदारी केली.
यानंतर निकोलस पूरन यानेही 17 चेंडूत नाबाद 32 धावा करत सामना एकतर्फी केला. चेन्नईचा गोलंदाज अंशुल कंबोज याच्यासाठी हा सामना विसरण्यासारखा ठरला. त्याने अवघ्या 2.4 षटकांत तब्बल 63 धावा दिल्या.
या विजयासह लखनऊने जरी बाद फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले असले, तरी चेन्नईच्या समीकरणात मोठा गोंधळ निर्माण केला आहे.
Comments are closed.