मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात इंधन काटकसरीचा ‘धूर’! सातारा येथे ‘पंतप्रधान आवास योजना’ मेळाव्यासाठी शेकडो बसेस, वाहनांचा ताफा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ‘वर्षा’ निवासस्थानातून मंत्रालयापर्यंत बुलेटवरून प्रवास केला. पण आज दुसऱ्याच दिवशी साताऱ्यात ‘पंतप्रधान आवास योजना’ मेळाव्याचे जंगी आयोजन करण्यात आले. यावेळी माणसे जमविण्यासाठी भाजपने शेकडो एसटी बसेस आणि वाहनांचा ताफा तैनात केला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमातच इंधन काटकसरीचा ‘धूर’ निघाला असून, भाजपच्या कथनी आणि करणीतील विरोधाभास स्पष्टपणे समोर आला, अशी संतप्त प्रतिक्रिया जनतेमध्ये उमटत आहे.

केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरांचा लोकार्पण सोहळा व महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित केला होता.

सध्या उष्णतेची लाट असल्यामुळे लोक कितपत उपस्थिती राहील याबद्दल साशंकता असावी. त्यामुळे या कार्यक्रमासाठी सरकारने पंतप्रधानांच्या आवाहनाला फाटा देऊन जंगी नियोजन केले. जिल्ह्याच्या जवळपास सर्व आगारातून मिळून उपलब्ध माहितीनुसार तब्बल ३३८ एसटी बसेस या कार्यक्रमाला माणसे जमवण्यासाठी आरक्षित केल्या होत्या. गावागावातून अंगणवाडी सेविका, आशा सेविका, महिला बचत गटाच्या सदस्य यांना घेऊन येण्यासाठी या एसटी बसेस पाठवण्यात आल्या होत्या. सातारला आल्यावर त्यांच्या पार्किंगसाठी जिल्हा परिषद मैदान, औद्योगिक वसाहत, वाढे फाट्याजवळ अशा तीन ठिकाणी मोठी व्यवस्था केली होती. याव्यतिरिक्त खाजगी वाहनांची गणती नाही. एका बाजूला पंतप्रधानांकडून इंधन काटकसरीचे आवाहन केले जात असताना या शेकडो वाहनांनी इंधनाचा दणकून धूर काढला.

ग्रामीण बस सेवा कोलमडली

प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी मेळाव्याकरिता माणसे जमवण्यासाठी शेकडो एसटी बसेस तैनात केल्यामुळे जिल्ह्यात ग्रामीण भागातील एसटी सेवा मात्र कोलमडून पडली. आपापल्या कामांसाठी केवळ एसटीवर अवलंबून असलेल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे, विद्यार्थी, नोकरदार वर्गाचे त्यामुळे मोठे हाल झाले.

पुढील सहा महिन्यांत मोठे कार्यक्रम नाहीत !

विशेष म्हणजे, याच कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात पुढील सहा महिन्यांत कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करणार नसल्याची घोषणा केली. ‘आज जगावर मोठे संकट आहे. या संकटाच्या काळात पंतप्रधान मोदींनी आपल्याकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. त्यानुसार पुढील सहा महिन्यांपर्यंत मोठे कार्यक्रम होणार नाहीत,’ असे त्यांनी सांगितले. दरम्यान, पाकिस्तानात पेट्रोलचा दर २०० रुपयांपेक्षा जास्त आहे. इतर देशांतही मोठ्या प्रमाणात दरवाढ आहे. मात्र, त्यांच्या तुलनेत आपल्या देशात केवळ साडेतीन टक्क्यांची दरवाढ असल्याचा दावा त्यांनी केला.

‘नाफेड’कडून १२.३५ दराने कांदा खरेदी – शिवराजसिंह चौहान

‘पश्चिम आशियातील व बांगलादेशातील संकटांमुळे कांद्याचे भाव पडले होते. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आजपासूनच ‘नाफेड’च्या माध्यमातून किलोला १२ रुपये ३५ पैसे या दराने कांदाखरेदी सुरू करण्यात आली आहे. कापूस, सोयाबीन, तुरीसह अनेक पिकांच्या ‘एमएसपी’मध्ये वाढ करण्यात आली आहे. साखरेच्या ‘एमएसपी’ संदर्भात लवकरच बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ,’ असे शिवराजसिंह चौहान यांनी या कार्यक्रमात सांगितले.

Comments are closed.