पेट्रोलपंपावर भरधाव टिप्परची धडक; महिलेचा पाय निकामी, घटना CCTV मध्ये कैद
यवतमाळ जिल्ह्यातील लाडखेड येथील रेणुका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असताना भरधाव टिप्परने दिलेल्या धडकेत एका महिलेचा पाय निकामी झाल्याची घटना घडली. ही संपूर्ण घटना पेट्रोल पंपावरील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोरगव्हाण येथील सुलभा एकनाथ राठोड या पती एकनाथ राठोड यांच्यासह दुचाकीवरून पेट्रोल भरण्यासाठी रेणुका पेट्रोल पंपावर थांबल्या होत्या. त्यावेळी टिप्परने अचानक धडक दिली. यावेळी टिप्परचे चाक सुलभा राठोड यांच्या पायावरून गेल्याने त्यांचा पाय गंभीर जखमी होऊन निकामी झाला.
या भीषण अपघातात पती एकनाथ राठोड हे थोडक्यात बचावले असून त्यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. जखमी महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, अद्याप या प्रकरणी तक्रार दाखल झालेली नसून तक्रार प्राप्त होताच तातडीने कारवाई करण्यात येईल, अशी माहिती लाडखेडचे पोलीस निरीक्षक विनायक लंबे यांनी दिली. संबंधित टिप्पर पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील चौकशी सुरू आहे.
Comments are closed.