मुंबई-गोवा महामार्गावर मृत्यूचा थरार; तुरळ येथे उभ्या कंटेनरवर टेम्पोची भीषण धडक
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसतानाच आज शुक्रवारी तुरळ येथे आणखी एक भीषण अपघात घडला. दुपारी पावणे बाराच्या सुमारास गणपती मंदिराजवळ भरधाव वेगातील टेम्पोने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात टेम्पो चालक गंभीर जखमी झाला आहे.
कंटेनरवर आदळल्यानंतर टेम्पो पलटी झाला. धडक इतकी भीषण होती की टेम्पोच्या केबिनचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. चालक रितेश पाटील हा रक्ताच्या थारोळ्यात केबिनमध्ये अडकून पडला होता.
घटनेची माहिती मिळताच राजवाडी येथील सचिन सुर्वे यांनी मिलिंद चव्हाण यांना कळवले. त्यानंतर मिलिंद चव्हाण यांनी सहकारी रिक्षा व्यावसायिकांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी चालकाला बाहेर काढण्यासाठी सर्वांनी शर्थीचे प्रयत्न केले. मिलिंद चव्हाण यांनी तत्काळ 108 रुग्णवाहिकेशी संपर्क साधून जखमी चालकाला संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. रमीज यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर चालकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.
दरम्यान, महामार्ग पोलीस पथकातील रियाज मुजावर, सोमनाथ आव्हाड आणि बळीराम शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.
Comments are closed.