घरात पाच एसी पण विजेचे बिल मात्र अवघे पाचशे रुपये… यवतमाळमधील वीजचोरीचा भंडाफोड, 65 बंगल्यांवर कारवाई
यवतमाळ शहरातील पांढरकवडा मार्गावरील गुलशन नगर आणि नागसेन सोसायटी परिसरात मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महावितरणने मंगळवारी सकाळी राबविलेल्या धाडसत्रात कोट्यवधींच्या आलिशान बंगल्यांमध्ये वीज चोरीसाठी विविध गैरप्रकार केल्याचे उघड झाले. या कारवाईत जवळपास एक कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती आहे.
महावितरणने मासिक वीज बिल आणि प्रत्यक्ष वीज वापरातील तफावत लक्षात घेत विशेष मोहीम हाती घेतली. यासाठी ६० अधिकारी-कर्मचाऱ्यांची १५ पथके तयार करण्यात आली होती. संवेदनशील भाग असल्याने अवधूतवाडी व शहर पोलीस ठाण्याचा कडक पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
सकाळी एकाच वेळी विविध घरांवर तपासणी सुरू करण्यात आली. यावेळी वीज चोरीसाठी वापरण्यात येणाऱ्या अनेक क्लृप्त्या समोर आल्या. काही ठिकाणी रिमोटद्वारे वीज मीटर बंद केले जात होते, तर काहींनी मीटरला जॅमर बसवले होते. काही घरांमध्ये सर्व्हिस वायरला थेट टॅप करून वीज चोरी केली जात होती, तर काहींनी न्यूट्रल कट करून मीटर बंद केल्याचे आढळले.
विशेष म्हणजे, काही आलिशान बंगल्यांमध्ये तब्बल पाच एसी सुरू असूनही मासिक वीज बिल अवघे ५०० रुपये येत असल्याचे पाहून वीज कर्मचारीही चक्रावून गेले. तपासणीनंतर या घरांमध्ये वीज चोरीचे प्रकार सुरू असल्याचे स्पष्ट झाले.
गेल्या दोन दिवसांत तब्बल ६५ आलिशान बंगल्यांवर कारवाई करण्यात आली असून अनेक ठिकाणी वीज चोरीचे प्रकार उघडकीस आले आहेत. संबंधितांवर महावितरणकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, वीज कंपनीचे पथक परिसरात येत असल्याची माहिती मिळताच अनेकांनी घरांना कुलूप लावून पळ काढल्याचेही समोर आले. अशा घरांची स्वतंत्र नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
या धाडसत्राचे नियोजन अधीक्षक अभियंता प्रवीण दारोळी, कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम चव्हाण आणि कार्यकारी अभियंता संजय खंगार यांनी केले. यवतमाळ शहरात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात वीज चोरीविरोधात कारवाई झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
Comments are closed.