इंधनाच्या टंचाईबाबत शिवसेना आमदार सिद्धार्थ खरात यांची थेट मंत्रालयात धाव; मिळाले सकारात्मक आश्वासन
मेहकर-लोणार मतदारसंघातील शेतकरी आणि वाहनधारकांना दिलासा देणारे वृत्त मिळाले आहे. मतदारसंघात निर्माण झालेली पेट्रोल आणि डिझेलची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सिद्धार्थ खरात यांनी बुधवारी थेट मंत्रालय गाठत याचा पाठपुरावा केला. आमदार सिद्धार्थ खरात यांच्या या मोहिमेला यश आले असून शासनाने मतदारसंघात इंधनाचा पुरवठा करण्याचे आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.
आमदार सिद्धार्थ खरात यांनी बुधवारी मंत्रालयात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, रेशनिंग आयुक्त चंद्रकांत डांगे, तसेच पेट्रोलियम व नॅचरल गॅसचे महाराष्ट्र राज्य समन्वयक विहीर जोशी यांच्यासह सर्व संबंधित तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींची उच्चस्तरीय बैठक घेतली.
या बैठकीत आमदार सिद्धार्थ खरात यांनी मेहकर मतदारसंघासह संपूर्ण बुलढाणा जिल्हा आणि लगतच्या वाशिम, अकोला व जालना जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेलच्या अभूतपूर्व टंचाई परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन वापराबद्दल केलेल्या आवाहनानंतर जिल्ह्यात आणि विशेषतः मेहकर-लोणार मतदारसंघातील दोन्ही तालुक्यात डिझेलची मागणी प्रचंड वाढली आहे. पेट्रोल पंप धारकांकडून डिझेलची आयात आणि विक्री वाढूनही पंपांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याची बाब आमदार खरात यांनी मंत्री, मुख्य सचिव आणि अप्पर मुख्य सचिवांच्या थेट निदर्शनास आणून दिली.
आमदार सिद्धार्थ खरात यांनी शेतकऱ्यांची समस्या मांडताना सांगितले की, सध्या खरीप हंगाम अगदी तोंडावर आला आहे. शेतीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना नांगरणी, वखरणी, रोटाव्हेटर चालवणे, शेतदुरुस्ती या सर्व कामांसाठी मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरचा वापर करावा लागत आहे. मात्र, सद्यस्थितीत पेट्रोल पंपांवर कॅनद्वारे (डब्यांमध्ये) डिझेल देण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. ट्रॅक्टर थेट पंपावर आणणे शेतकऱ्यांना शक्य नसल्याने शेतीची कामे पूर्णपणे खोळंबली असून शेतकरी वर्ग कमालीचा त्रस्त झाला आहे,
यावर तोडगा म्हणून, खरीप हंगामापुरते शेतकऱ्यांना पेट्रोल पंपावर कॅनद्वारे डिझेल पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. हा पुरवठा करताना पारदर्शकता राहावी म्हणून शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टरचे आरसी बुक (RC Book) किंवा फार्मर आयडी (Farmer ID) घेऊन, तसेच काही ठराविक नियम करून किमान २० ते ३० लीटर डिझेल कॅनमध्ये देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ सूचना द्याव्यात, अशी मागणी आमदार खरात यांनी लावून धरली.
आमदार सिद्धार्थ खरात यांच्या या मागण्यांची अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी अत्यंत सकारात्मक दखल घेतली. त्यांनी रेशनिंग आयुक्तांना तात्काळ पावले उचलण्याचे आदेश दिले. त्यानुसार, रेशनिंग आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी तातडीने संबंधित पेट्रोल व डिझेल कंपन्यांच्या प्रतिनिधींची तातडीची बैठक घेतली आणि मेहकर-लोणार मतदारसंघासह संबंधित जिल्ह्यांत पेट्रोल व डिझेलचा अतिरिक्त पुरवठा करण्याचे कडक निर्देश दिले. तसेच, आमदार खरात यांच्या मागणीनुसार बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांनाही आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनामार्फत देण्यात आले आहेत.यावेळी जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत सुद्धा उपस्थित होते.
आपल्या मतदारसंघातील शेतकरी आणि जनतेची अडचण सोडवण्यासाठी तातडीने निर्णय घेतल्याबद्दल सिद्धार्थ खरात यांनी छगन भुजबळ, राजेश अग्रवाल, अनिल डिग्गीकर आणि चंद्रकांत डांगे यांचे आभार मानले आहेत. सरकारच्या या सकारात्मक निर्णयामुळे मेहकर आणि लोणार तालुक्यातील शेतकरी राजाला मोठा दिलासा मिळाला आहे.
Comments are closed.